आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर नैऋत्य मोसमी वा-यांनी राज्यातील बुलडाणा आणि विदर्भातील काही भागांतून माघार घेतल्याचे वेधशाळेने गुरुवारी जाहीर केले. संपूर्ण देशभरातून मान्सून साधारणतः १५ ऑक्टोबरपर्यंत माघारी फिरतो. परंतु गेल्या तीन वर्षांत ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत देशात नैऋत्य मोसमी वाा-यांचा प्रभाव आढळला. या आठवड्यात दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रांतील काही भागांत पावसाचा मुक्काम राहील, असे चित्र आहे. या आठवड्यात ठाणे, मुंबईतूनही पाऊस माघारी फिरेल, अशी चिन्हे आहेत.
( हेही वाचा : फटाक्यांना आवाजाच्या तपासणीत पैकीच्या पैकी गुण; पण क्यूआर कोडचं नाहीत, वाचा तपासणी अहवाल )
बंगालच्या उपसागरात यंदाच्या वर्षांतील पावसाचा ऋतुमान संपल्यानंतर पहिल्या वादळाची निर्मिती होत आहे. या वादळाची निर्मिती होत असताना नैऋत्य मोसमी वा-यांतील बहुतांश बाष्प वादळाच्या निर्मितीसाठी खेचले जाईल. येत्या ४८ तासांत वादळ सतरंग बंगालच्या उपसागरात तयार होईल. वादळ पश्चिम बंगालच्या किंवा ओदिशा-आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीला धडकणार आहे, याबाबत अद्याप वेधशाळेने काहीच सूचक वक्तव्य केलेले नाही. वादळ ओदिशा-आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीला धडकल्यास विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत वादळातील बाष्पामुळे पावसाची शक्यता आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने गुरुवारी दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील परतीच्या पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. सोमवारी २४ ऑक्टोबरपर्यंत राज्यात कोरडे वातावरण राहील.
Join Our WhatsApp Community