चंद्रपूरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांत माणसाचा आणि वाघाचा मृत्यू

138

चंद्रपूरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून एका घटनेत महिलेचा आणि दुसऱ्या घटनेत वाघाचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूरातील ब्रह्मपुरीतील शेतात काम करणा-या महिलेवर दुपारी वाघाचा हल्ला झाला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. तर बल्लारपूर येथे ३ वर्षांच्या वाघाचा मृतदेह आढळला. वाघाचे सर्व अवयव सुखरुप असल्याने ही शिकारीची घटना नसल्याची माहिती वनाधिका-यांनी दिली. मात्र मूल तालुक्यातील दोन माणसांना मारणा-या आणि ब्रह्मपुरीतील शेतात काम करणा-या महिलेवर हल्ला करणाऱ्या वाघाला जेरबंद केले करण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे परवानगी घेत असल्याची माहिती चंद्रपूर वनविभाग (प्रादेशिक)चे मुख्य वनसंरक्षक किशोर माणकर यांनी दिली.

( हेही वाचा : राज्यातील इंटरनेट सेवा आणखी गतिमान होणार; ‘5G’ साठी विशेष धोरण)

चंद्रपूरात शेतात कापणीसाठी गेलेल्या रुपा म्हस्के (४३) या महिलेवर वाघाचा हल्ला झाला. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात रुपा यांचा मृत्यू झाला. या घटनेतील वाघाची ओळख पटली नसून, शुक्रवारी सकाळी वाघ संबंधित ठिकाणी कॅमेरा ट्रेपमध्ये अडकल्यास वाघाची ओळख पटू शकते, अशी माहिती मोणकर यांनी दिली. वाढत्या वाघांच्या हल्ल्यांच्या घटना पाहता ठिकठिकाणी वनाधिका-यांचे टेहाळणी पथकही वाढवले आहेत अशी माहिती माणकर यांनी दिली. वाघांच्या ओळखीसाठी प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले.

दुसरीकडे बल्हारशाह परिक्षेत्रात कक्ष क्रमांक ४३९ मध्ये टेहाळणी पथकाला वाघाचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या शरीरीचे अवयव सुरक्षित आढळून आले असले तरीही या प्रकरणी वनाधिका-यांनी प्राथमिक वनगुन्हा नोंदवला आहे. वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले आहे. तसेच पुढील तपासासाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत वाघाच्या शरीराचे अवयव पाठवले गेल्याचे बल्हारशाह विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.