महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दादरच्या शिवाजी पार्क परिसरात दिपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या दिपोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा दिपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा देतानाच राज ठाकरे यांचे देखील आभार मानले. तसेच राज ठाकरे हे आमच्याकडे कधीही येऊ शकतात, आम्ही त्यांचं कायम स्वागत करू, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.
राज ठाकरेंचं कायम स्वागत
गेल्या 10 वर्षांपासून शिवाजी पार्क परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन मनसेच्या वतीने करण्यात येते. आम्हाला इच्छा असूनही या कार्यक्रमाला आजवर कधी उपस्थित राहता आलं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी योगायोग असावे लागतात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले. तसेच राज ठाकरे हे कायमंच सरकारकडे जनतेचे प्रश्न घेऊन येत असतात.
त्यांनी शेतक-यांना मदत व्हावी म्हणून नुकतीच मागणी केली असून राज्य सरकारनेही या मागणीचा स्वीकार करत शेतक-यांना मदत देण्याचं ठरवलं आहे. मी आणि फडणवीस हे उशिरापर्यंत काम करत असतो. त्यामुळे राज ठाकरे हे जनतेचे प्रश्न घेऊन रात्री अपरात्री कधीही आमच्याकडे येऊ शकतात आम्ही त्यांचं कायम स्वागत करू, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.
या सोहळ्याची शोभा वाढत जाईल-राज ठाकरे
यावर्षीचा दिपोत्सव हा जास्त मोठा आहे. नातू झाला म्हणून यावर्षी दिपोत्सव जोरात आहे का, असा सवाल मला काही जणांनी विचारला. पण तसं काही नसून या दिपोत्सवाची शोभा उत्तरोत्तर अशीच वाढत जाईल, असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले आहेत. 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत या दिपोत्सवाचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे.
Join Our WhatsApp Community