…अन् दुचाकीची लिफ्ट घेत केसरकर पोहोचले वरळी कोळीवाड्यात

109

मंत्री म्हटला की लाल दिव्याची गाडी, पोलिसांचा ताफा आणि संरक्षणासाठी धिप्पाड शरीरयष्टीचे अंगरक्षक, अशीच छबी डोळ्यांसमोर येते. पण, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी मंत्रिपदाचा राजशिष्टाचार बाजूला ठेवून चक्क दुचाकीची लिफ्ट घेत कार्यक्रम स्थळ गाठले. मंत्र्यांच्या या साध्या वर्तवणुकीमुळे वरळी कोळीवाड्यातील नागरिकही अचंबित झाले.

( हेही वाचा : राज ठाकरे कधीही आमच्याकडे येऊ शकतात त्यांचं स्वागत आहे, मनसेच्या दिपोत्सवात मुख्यमंत्र्यांचे विधान)

मुंबई शहरातील ससून डॉक कुलाबा, कफ परेड, वरळी आणि माहिम येथील कोळीवाडा बंदरे (जेट्टी) आणि वसाहतींची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी कोळीवाडा वसाहतीतील रहिवासी, मच्छिमार संघटनांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या. सुरुवातीला भारतीय मत्स्य सर्वेक्षण कार्यालयात कुलाब्यातील ऐतिहासिक वैभव असलेल्या ससून डॅाकमधील स्थानिक महिला आणि मच्छिमारांना तातडीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठक घेतली.

वरळी कोळीवाड्याच्या दिशेने रवाना होताना पालकमंत्र्यांचा राजशिष्टाचार बाजूला सारून केसरकर हे दुचाकीची लिफ्ट घेवून पाहणी स्थळी पोहोचले. वरळी कोळीवाडा हा मुंबईतला गजबजलेला भाग आहे. पालकमंत्र्यांच्या या सामान्य माणसांसारख्या वागणूकीचे स्थानिकांनी कौतुक केले. या पाहणी दरम्यान वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कोळीवाड्याच्या सौंदर्यीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यासंदर्भातील आराखडा तयार करण्याचे निर्देशही केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

ससून डॅाकमधील मच्छिमार, महिला कामगारांसाठी पायाभूत सुविधा

ससून डॅाक येथील मच्छिमार संघांच्या मागण्यांवर मंत्री केसरकर म्हणाले, येथील मच्छिमार नौकांना डिझेल पुरवठ्यासाठी तात्पुरती व्यवस्था करावी तसेच मच्छिमार, सर्व कामगारांसाठी पिण्याचे पाणी तत्काळ उपलब्ध करून द्यावे, त्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पाण्याच्या टाक्या बसवाव्यात. डॅाक परिसरात हाय मास्ट लॅम्प, पथदिवे(स्ट्रीट लाईट) बसवावे. ससून डॅाक येथे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात करावे. याठिकाणी ब्रेकवाटरची मागणी मच्छिमारांकडुन होत असून ब्रेकवॅाटर तयार करून त्यांना दिलासा द्याव. मालाच्या लिलावासाठी लिलाव हॅाल, वितरण मार्केट उपलब्ध करावे. कचऱ्याची विल्हेवाट लावावी. मुंबई पोर्ट ॲथॅारिटीची परवानगी घेवून मच्छिमार बांधव आणि कामगार महिलांसाठी शौचालय, स्नानगृह, वेगवेगळे विश्रामगृह उभारावे. या सर्व कामांचा आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा, यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कफ परेड कोळीवाड्याचे सौंदर्यीकरण

कफ परेड कोळीवाड्याची (जेट्टी) पाहणी करतांना या परिसराच्या सौंदर्यीकरणाचा आराखडा तयार करावा. या आराखड्यामध्ये मच्छिमारांसाठी आरसीसी शेड, संरक्षण भिंत बांधणे, सोलर ड्रायर बसवणे, बंदिस्त प्रवेशद्वार बांधणे,रस्ता बांधणे आदी विकासांची कामे समाविष्ट करण्याचे निर्देश केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्यात पालकमंत्री केसरकर यांनी माहिम येथील कोळीवाड्याची सुद्धा पाहणी केली. या वेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन आदी विभागाचे अधिकारी आणि विविध मच्छिमार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.