सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने अवघ्या १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय घेतला. परंतु, दिवाळी आली, तरी रेशन लाभार्थ्यांपर्यंत शिधा न पोहोचल्याने दिवाळीचा फराळ बनवायचा कधी, असा पेच सर्वसामान्यांसमोर निर्माण झाला आहे.
राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना
दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी ४८६ कोटी ९४ लाख खर्चास मान्यता देण्यात आली. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेलाचा समावेश करण्यात आला. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होईल, असा दावा त्यावेळी करण्यात आला. परंतु, धनत्रयोदशी आली तरी मुंबईसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत आनंदाचा शिधा पोहोचला नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ज्या रेशन दुकानांत शिधा पोहोचला, तेथे ई-पॉस यंत्र काम करीत नसल्याने वितरणात अडचणी येत आहेत. हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर पडताच त्यांनी ऑफलाइन शिधा वितरित करण्याचे निर्देश दिले. मात्र, ज्या दुकानांत शिधा पोहोचलेला नाही, त्यांचे काय, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दिवाळीपूर्वी वाटपाचा दावा फोल
हा शिधा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. दिवाळीपूर्वी त्याचे वाटप केले जाईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर केला होता. तसेच शिधा वितरणात कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र दिवाळीपूर्वी वाटपाचा दावा पूर्णतः फोल ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
Join Our WhatsApp Community