मनसेच्या राजू पाटील यांचं महायुतीवर मोठं वक्तव्य; म्हणाले, “… तर आम्ही युतीसाठी तयार असू”

175

मुंबईसह राज्याच्या अनेक मुख्य शहरातील महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे प्रमुख पक्षातील नेते मंडळी या निवडणुकीच्या तयारीला देखील लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मनसे आणि भाजप, शिंदे गट यांच्यात युती होणार का… असा सवाल उपस्थित केला जात असून सध्या याचीच जोरदार चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान गेल्या काही दिवासांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेटीगाठी, चर्चा देखील वाढल्याचे चित्र पाहायला मिळत असताना महायुतीवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मोठं वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेकांच्या भुवया देखील उंचावल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा- चीनमध्ये पुन्हा शी जिनपिंग यांची राजवट, तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड)

काय म्हणाले राजू पाटील

महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट आणि मनसे यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरू असताना मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की जर तशी वेळ आली आणि राज साहेबांचा आदेश आला तर आम्ही युतीसाठी तयार असू. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, काही गोष्टींचा विचार करताना राजकारण सोडून त्या बघितल्या गेल्या पाहिजे. सरकार जर आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार करणार असेल तर सोबत येण्यास काहीच हरकत नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार झाला नाही. तर त्या मागण्या कशी पूर्ण होणार नाहीत, याचे प्रयत्न केले गेल्याचे राजू पाटील यांनी म्हटले आहे.

आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार केला जात असल्याने आमची जवळीक वाढली आहे. मात्र या भेटीगाठीचा कोणीही कोणताही अर्थ काढू नये, कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच राज साहेबांनी सांगितले की, आम्ही स्वबळावर लढणार आहोत. परंतु काही परिस्थिती निर्माण झाली तर युती करायलाही हरकत नाही. जर आदेश दिला तर त्याला तयार असू आणि इतरांची पण हरकत नसावी, असे स्पष्टपणे राजू पाटील यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.