बंगालच्या उपसागरात तयार होणा-या वादळाची तीव्रता वाढत असल्याचे केंद्रीय वेधशाळेने रविवारी सकाळी जाहीर केले. वादळापूर्वी तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर आता डीप डीप्रेशनमध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास झाले, अशी माहिती केंद्रीय वेधशाळेने रविवारच्या सकाळच्या बुलेटीनमध्ये दिली.
(हेही वाचा – सोनिया गांधींना मोठा धक्का, राजीव गांधी फाउंडेशनवर केंद्र सरकारकडून कारवाई)
वादळ सित्रांग हे भारताला नव्हे तर बांग्लादेशला थडकणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मंगळवारी सकाळी वादळ सित्रांग बांग्लादेशमधील तिणकोणा बेट आणि सॅण्डवीपदरम्यान धडकणार असल्याचे केंद्रीय वेधशाळेने सांगितले.
ओदिशा आणि नजीकच्या पश्चिम बंगालच्या परिसरात सोमवार ते मंगळवारी सकाळपर्यंत वादळातील बाष्पाच्या प्रभावामुळे अतिवृष्टी होईल. ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये सोमवारी अतिवृष्टी होईल. या भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. मंगळवारीही काही भागांत अतिवृष्टी कायम राहील. त्याचदरम्यान दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही दिवसांतच ईशान्य मोसमी वारे दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत. वादळातील बाष्प नाहीसे झाले की, बुधवारनंतर दक्षिणेकडील राज्यांत ईशान्य मोसमी वा-यांमुळे पावसाला सुरुवात होईल.