बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांना लोकप्रिय अशा केबीसी-14 च्या सेटवर दुखापत झाली होती. त्यांच्या पायाची नस कापली गेल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले आहे. याबाबत स्वतः महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून खुलासा केला आहे.
आपल्या पायाची नस कापली गेल्याने त्यांच्या जखमेला टाके घालण्यात आले आहेत. आता आपण पूर्णपणे बरे झालो असून काळजीचे कोणतीही कारण नाही, अशी माहिती अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे.
कशी झाली दुखापत?
केबीसी-14 चे शूट सुरू असताना सेटवर बाहेर निघालेला एक धातूचा तुकडा आपल्या पायाला लागला. त्यामुळे आपल्या पायाची नस कापली गेली. त्यामुळे प्रचंड रक्तस्राव होऊ लागला. झालेल्या जखमेला टाके घालण्यात आल्यानंतर आता आपण पूर्णपणे बरे असल्याचे अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, शूटिंगदरम्यान केबीसीच्या सेटवर आपली पूर्ण काळजी घेतली जात असल्याचेही अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून स्पष्ट केले आहे. नुकतेच 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन हे 80 वर्षांचे झाले. त्यानिमित्त केबीसीने एक खास एपिसोड केला होता. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन आणि पुत्र अभिषेक बच्चन हे देखील सहभागी झाले होते.
Join Our WhatsApp Community