बंदी असतानाही फटाक्यांत वापरली जातात घातक रसायने

167

देशभरात सर्वच फटाके निर्मिती कंपन्यांना आता हरित फटाके बनवणे बंधनकारक आहे. परंतु काही फटाक्यांत अतिशय घातक रसायने अद्यापही वापरली जात असल्याचे ध्वनी प्रदूषणाविरोधात काम करणा-या आवाज फाऊंडेशन या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे.

प्रयोगशाळा चाचणीत खुलासा

बेरियम सॉल्ट नावाचे घातक रसायन सर्वच फटाक्यांमध्ये छुप्या पद्धतीने वापरले जात असल्याचा धक्कादायक खुलासा प्रयोगशाळा चाचणीतून उघडकीस आल्याचे आवाज फाऊंडेशनच्या संस्थापिका सुमैरा अब्दुलली म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयाने बेरियम सॉल्ट वापरण्यावर बंदी घातलेली असताना आताही बेरियम सॉल्टसह फटाके बनवले जात आहेत. या प्रकरणी अब्दुलली यांनी वरिष्ठ सरकारी यंत्रणांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.

गेल्या वर्षीही आवाज फाऊंडेशनने बाजारातील उपलब्ध फटाक्यांची प्रयोगशाळा चाचणी केली होती. त्यावेळी बेरियम सॉल्टसह फटाके वापरले जात असल्याचे प्रयोगशाळा चाचणी अहवालातून उघडकीस आले. यंदाच्यावर्षीही अब्दुलली यांनी बाजारातील फटाक्यांची प्रयोगशाळा चाचणी करुन घेतली. या प्रयोगशाळा चाचणीत अर्सेनिक, सल्फर तसेच क्लोरिनही फटाक्यांमध्ये वापरले असल्याचे आढळून आले.

घातक रसायने आढळून आलेले फटाके 

सियाराम फायरवर्क्स – प्लॅन प्रिमियम स्पार्कल्स – बेरियम सॉल्ट

मनोज फायरवर्क्स – रेनबो १२० मल्टी कलर, युनिन्हर्सल हिरो- बेरियम सॉल्ट

राजू कन्ना फायरवर्क्स फॅक्टरी – डबल धमाका, इंडिया- बेरियम सॉल्ट

वनिथा – फ्लॉवर प्लॉट्स – बेरियम सॉल्ट

विनयंगा फायरवर्क्स – कलर कॉटी – बेरियम सॉल्ट

वनिथा फायरवर्क्स इंडस्ट्रीज – बेरियम सॉल्ट

स्टॅण्डर्ड फायरवर्क्स – डॉलर व्हिल – अर्सेनिक

महालक्ष्मी चंद्रा – इलेक्ट्रीक – बेरियम सॉल्ट आणि लीड

राजकुमार्स – क्लासिक बॉम्ब ग्रीन – बेरियम सॉल्ट

सोनल फायरवर्क्स फॅक्टरी – मर्क्युरी आचिलिस – बेरियम सॉल्ट

हरित फटाक्यांची निर्मिती करणे सर्व फटाके निर्मिती कंपन्यांना बंधनकारक आहे. घातक रसायने वापरल्याने माणसाच्या श्वसनमार्गाला तसेच इतर अवयवांनाही त्रास उद्भवू शकतो. आम्ही तपासलेल्या काही फटाक्यांवर क्यूआर कोडही नव्हता. सरकारी पातळीवर वरिष्ठ अधिका-यांनी स्वतःहून या घटनांची नोंद घ्यावी. राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे. नियमांचे उल्लंघन करणा-या फटाक्यांची विक्री होत असेल तर तातडीने कारवाई व्हायला हवी.

 

-सुमैरा अब्दुलली, संस्थापिका, आवाज फाऊंडेशन

 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.