पालिकेतील रुग्णालयांत वापरल्या जाणा-या ग्लोव्जमध्ये टेंडर घोटाळा, काय आहे प्रकरण?

110

पालिका रुग्णालयात रुग्णांना तपासण्यासाठी वापरल्या जाणा-या तपासणी ग्लोव्जच्या (एक्झामिशेन ग्लोव्ज)टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. ग्लोव्जचा आकार सहा सेंटीमीटर वाढवल्याने नव्या टेंडर प्रक्रियेत समोर आलेल्या पुरवठादार कंपन्यांनी किंमतीत सहापटीहून अधिक वाढ केल्याने पालिकेच्या बजेटवर चांगलाच हातोडा पडणार आहे.

दरवर्षी या तपासणी ग्लोव्जसाठी पालिका केवळ २ कोटी रुपये मोजत होती. परंतु आता थेट ११ कोटींचा फटका पालिकेला पडणार आहे. ही टेंडर प्रक्रिया लवकरच अंतिम टप्प्यात येत असताना पालिका सहआयुक्त (पश्चिम उपनगरे)डॉ. संजीव कुमार यांनी याप्रकरणी तपासाचे आश्वासन दिले आहे.

(हेही वाचाः बंदी असतानाही फटाक्यांत वापरली जातात घातक रसायने)

नव्या पुरवठादारांना संधी

पालिका दरवर्षाला १ लाखांहून अधिक तपासणी ग्लोव्ज खरेदी करते. या ग्लोव्जचा आकार केवळ २३ सेंटीमीटरचा असतो. यंदा २३ सेंटीमीटरऐवजी २९ सेंटीमीटरच्या तपासणी ग्लोव्जची खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यामुळे अचानक केलेल्या बदलांत दरवर्षाला पालिकेला ग्लोव्ज पुरवणारे ठराविक पुरवठादार पुरते गोंधळले. नव्या बदलामुळे पुरवठादारांची स्पर्धाही रंगली नाही. परिणामी काही नवीन व ठराविक पुरवठादारांना या टेंडर प्रक्रियेत अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी मुद्दामहून तयार करुन स्थानिक पुरवठादारांची बाजारपेठ उध्वस्त करण्याचा डाव असल्याचा आरोप फूड एण्ड ड्रग्स लायसन्स होल्डर असोसिएशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे.

कारवाईची मागणी

साधारणतः एका ग्लोव्जच्या बॉक्समध्ये अंदाजे शंभर ग्लोव्ज दिले जातात. या एका बॉक्ससाठी दरवर्षाला पालिका १७७ रुपये मोजते. कोरोना काळातही या किंमतीत वाढ झाली नव्हती. क्वचितच या किंमती २४० पर्यंत दिसून येतात. मात्र आता ९५२ पर्यंत ग्लोव्जच्या किंमती पोहोचल्याने पालिकेचे बजेट २ कोटींहून थेट ११ कोटींवर गेल्याने एवढ्या कोटींचा ताण पालिकेवर पडणार आहे. यामागे दोषी पालिका अधिका-यांवर कारवाईचीही मागणी स्थानिक ग्लोव्ज पुरवठादारांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.