बेस्टचे कंत्राटी कर्मचारी सलग तिसऱ्या दिवशी संपावर; प्रवाशांची गैरसोय

184

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरूवात केली आहे. शनिवारी केवळ सांताक्रुझ आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. याच पद्धतीने आता जोगेश्वरी येथील मजास आगार, धारावी आगार, प्रतीक्षा नगर आगार या डेपोतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

( हेही वाचा : पानिपतची लढाई आणि फटाक्यांशी भारतीयांची ओळख; ‘असा’ आहे फटाक्यांचा रंजक इतिहास)

बेस्टच्या नियमित कर्मचाऱ्यांसारखा बोनस, पगारवाढ मिळावी ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. त्या सुविधा आम्हाला का मिळत नाहीत अशा अनेक मागण्यांसाठी बेस्टचे कंत्राटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. जोगेश्वरीतील मजास आगारातील जवळपास ३०० कंत्राटी कर्मचारी संपावर गेले असून या संपाचा परिणाम आता पश्चिम उपनगरात पहायला मिळत आहे.

बोनस जाहीर केला, तरी संपावर ठाम

प्रशासनाने या बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला तरीही हे कंत्राटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. आम्हाला आमच्या ट्रेनिंग कालावधीमध्ये २३ हजार ५०० पगार देणार असे सांगण्यात आले होते प्रत्यक्षात एवढा पगार मिळत नाही. अधिकाऱ्यांपासून होणारा त्रास कमी व्हावा, पगारवाढ, जॉयनिंग लेटर या मागण्या करण्यात आल्या आहेत. बेस्टच्या वाहक म्हणजेच कंडक्टरला १८ हजार ५०० रुपये पगार सांगितलेले मात्र त्यांना प्रत्यक्षात फक्त १२ हजार ६०० रुपये पगार दिला जातो. नोकरी देताना सहा तास काम करायचे सांगितले होते मात्र काम आठ तासांहून अधिक होते. त्याचा ओव्हर टाइमही मिळत नाही अशा तक्रारी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या होत नाहीत तसेच या मागण्या मान्य केल्याचे लिखित पत्र दिले जात नाही तोपर्यंत कंत्राटी कर्मचारी हे आंदोलन सुरू ठेवणार आहेत असे एका कर्मचाऱ्याने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. यापूर्वी शनिवारी आणि रविवारी देखील बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. मातेश्वरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. रविवारी, जोगेश्वरीतील मजास आगार, शीव येथील प्रतीक्षा नगर या डेपोंमध्येही काम बंद आंदोलन करण्यात आले होते. दुपारी कर्मचारी, कंत्राटदार आणि बेस्ट प्रशासनामध्ये झालेल्या चर्चेनंतर काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर, आज हंसा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आंदोलनाला सुरुवात केली आहे मुंबईतील दिंडोशी, मरोळ, शिवाजीनगर, वरळी या डेपोमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या परिणामी बेस्ट बस वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.