विदर्भ ते कोकण प्रांत जोडणारी नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडी आता ३१ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. नागपूर जंक्शन ते मडगाव गोवा दरम्यान ही गाडी सध्या हंगामी स्वरूपात धावत आहे.
( हेही वाचा : पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह ‘या’ दिग्गजांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!)
गाडीची मागणी लक्षात घेऊन मुदतवाढ
विदर्भ, खान्देशातून कोकणात थेट येण्यासाठी रेल्वेगाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. गणेशोत्सव आणि दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव गोवा (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी ऑक्टोबर अखेरपर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, गाडीची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी ३१ डिसेंबरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी आठवड्यातून दोनदा नागपूर जंक्शन येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगाव गोव्याला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पोहोचेल. मडगावहून ही गाडी (क्र. ०११४०) गुरुवार तसेच रविवारी रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता नागपूर जंक्शनला पोहोचेल.
या प्रवासात ही गाडी वर्धा जं, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवी तसेच करमळी येथे थांबणार आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून ३८ फेऱ्या होणार आहेत. या गाडीचे संगणकीय आरक्षण ऑनलाइन तसेच आरक्षण खिडकीवर सुरू आहे असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी मडगाव पॅसेंजर ट्रेन वर्षअखेरपर्यंत रद्दच
गेल्या ऑगस्टपासून रद्द करण्यात आलेली कोकण रेल्वेची रत्नागिरी मडगाव पॅसेंजर गाडी (क्र. 10101/10102) या वर्षअखेरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. याआधीच्या सूचनेनुसार ही गाडी ऑक्टोबर अखेरपर्यंत रद्द करण्यात आली होती. मात्र रत्नागिरी आणि मडगाव या मार्गावरील काही बोगद्यांच्या डागडुजीच्या कामामुळे ही गाडी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्याचे कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community