दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आरेत गालबोट, दीड वर्षांच्या मुलीवर बिबट्याचा हल्ला

194

आरेत सोमवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दिवाळी पहाटच्या निमित्ताने आईसोबत सकाळी मंदिरात जाण्यासाठी निघालेल्या इतिका अखिलेश लोटे या दीड वर्षांच्या मुलीवर वाटेतच बिबट्याने हल्ला केला. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा – सुदानमध्ये आदिवासींमध्ये रक्तरंजित संघर्ष, तब्बल 200 जणांचा मृत्यू)

आरेतील युनिट क्रमांक १५ येथे राहणा-या इतिका आणि तिची आई सकाळीच नजीकच्या मंदिरात जाण्यासाठी निघाले होते. मंदिरात दिवा लावण्यासाठी इतिकालाही आईने सोबत घेतले. इतिका आईसोबत चालतच जात होती. तेवढ्यात बिबट्याने इतिकावर हल्ला केला. तिला शंभर मीटरवर फरफडत नेले. आईने व आजूबाजूनच्यांनी ओरडायला सुरुवात केल्यानंतर बिबट्याने इतिकाला वाटेतच सोडत धूम ठोकली. या घटनेनंतर इतिकाला मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेबाबत माहिती मिळताच वनाधिकारीही सेव्हन हिल्स रुग्णालयात पोहोचले. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी आम्ही करणार आहोत, अशी माहितीही वनाधिका-यांनी दिली.

बिबट्याचा अधिवास असलेल्या क्षेत्रात सायंकाळ आणि पहाटेपर्यंत लहान मुलांना घराबाहेर काढू नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे. बिबट्याचे माणूस भक्ष्य म्हणून आवडत नाही. डोळ्याला समांतर दिसणारे कुत्रे किंवा बक-या बिबट्या आपले भक्ष्य बनवतो. त्यातच कित्येकदा लहान मुलांवर बिबट्याचा हल्ला होतो. बिबट्याच्या अधिवासक्षेत्रात आवश्यक काळजी घ्या, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.