उद्धव ठाकरे यांनी नुकताच औरंगाबाद दौरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका देखील केली. त्यांच्या या टीकेला विरोधकांनि चोख प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांनी आधी यांच्यावरच आसूड ओढायला हवा, अशी घणाघाती टीका दानवे यांनी ठाकरेंवर केली आहे.
दानवेंची टीका
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे कधीही घराबाहेर पडले नाहीत. आपले कुटुंब, आपली जबाबदारी इतकेच काम त्यांनी या काळात केले. राजा जोपर्यंत जनतेत जात नाही तोपर्यंत त्याला जनतेचे दुःख कळत नाही. आता मात्र उध्दव ठाकरे घराबाहेर पडत लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण याचे श्रेय त्यांना नाही तर मुख्यमंत्री शिंदेंना जाते.
शेतकऱ्यांना त्यांनी सरकारवर आसूड उगारण्याचा सल्ला दिला आहे. स्वतः उद्धव ठाकरेंनी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिला आसूड यांच्यावर ओढला पाहिजे, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
काय म्हणाले होते ठाकरे?
तुमच्या हातातला आसूड केवळ हातात ठेऊ नका तर तो ओढायला शिका. या सरकारला जर का पाझर फुटत नसेल तर घाम फोडा. आमच्याशी गद्दारी केली पण शेतकऱ्यांशी करू नका. या निर्दयी सरकरकडे भावनांचा दुष्काळ आणि घोषणांची अतिवृष्टी आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली होती.
Join Our WhatsApp Community