उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करत शेतक-यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली. त्याला आता शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी यावरुन उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंनी केवळ देखाव्यासाठी हा दौरा केला आहे. किंवा तसं नसेल तर मनापासून मला वाटतं की अजित पवारांनी आता विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा आणि उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं, असा खोचक टोला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
उद्धव ठाकरेंची अवस्था कावीळ झाल्यासारखी
उद्धव ठाकरेंची अवस्था ही सध्या कावीळ झालेल्या माणसासारखी झाली आहे. कावीळ झालेल्या माणसाला जसं सगळं जग पिवळं दिसतं तसंच त्यांचं झालं आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षांत मुख्यमंत्री असताना कधी मातोश्रीतून बाहेर आले नाहीत, मंत्रालयात केवळ दोन ते तीन वेळा आले. त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही आणि त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यांनी कधीही वादळग्रस्त आणि दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसले नाहीत. पण आज मला आनंद झाला की ते कोल्हापुरात शेतक-यांच्या बांधावर गेले. त्यांचा अभ्यास किती आहे ते मला माहीत नाही. पण अजून परतीचा पाऊस चालू आहे. त्यामुळे जोपर्यंत पाऊस जात नाही तोपर्यंत पंचनामे करता येत नाहीत, अशी टीकाही कदम यांनी यावेळी केली आहे.
Join Our WhatsApp Community