तुम्ही पुणेकर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही कामानिमित्त किंवा घरी कोणी आलेल्या मित्र-मंडळी, नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर जात असाल तर आता तुम्हाला थोडी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. कारण पुणे रेल्वे स्थानकावर दिवाळीच्या सुटीमुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण आणण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या तिकीट दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज, सोमवारपासून पुढील आठ दिवस प्लॅटफॉर्मचे तिकीट दहा रुपयांऐवजी ३० रुपये करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी सीमेवर जवानांसोबत साजरी केली दिवाळी, बघा व्हिडिओ)
पुणे रेल्वे स्थानकावर दिवाळीच्या सुटीमुळे प्रवाशांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. प्रामुख्याने उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठी गर्दी दिसून येत आहे. शनिवारी (२२ ऑक्टोबर) रात्री गर्दीत अचानक त्रास झाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. शनिवारी रात्री पुणे-दानापूर गाडीसाठीही मोठी गर्दी झाली होती. एक प्रवासी गर्दीतून नातलगांसह गाडी पकडण्यासाठी जात असताना त्याला अचानक त्रास झाला. हा व्यक्ती पूर्वीपासूनच आजारी होता. त्रास झाल्यामुळे त्याच्या नातलगांनी त्याला मोकळ्या जागेत आणले. तेथे तो बेशुद्ध झाला. काही वेळाने स्थानकातील डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. बौधा मांझी (मूळ रा. बिहार) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो पुण्यात मजुरी कामासाठी आला होता, अशी माहिती मिळतेय.
याप्रकारानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून रेल्वे स्थानकावर पोलीस, आरपीएफ व तिकीट निरीक्षकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. तसेच कोणतीही वाईट घटना घडू नये, म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. २४ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान फलाटाचे तिकीटही वाढवण्यात आले आहे. दरम्यान, आरपीएफचे मुख्य सुरक्षा आयुक्त अजय सदानी यांच्यासह पुणे विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे स्थानकाची पाहणी केली.
Join Our WhatsApp Community