ब्रिटनमध्ये मोठा इतिहास घडला आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. सुनक यांनी पेनी मोरडॉन्ट यांना पराभूत करत अखेर विजय मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऋषी सुनक हे 28 ऑक्टोबरला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.
सुनक यांना तब्बल 180 पेक्षा जास्त खासदारांचे समर्थन मिळाले असून पेनी मोरडॉन्ट यांना फार समर्थन न मिळाल्यामुळे त्यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे ऋषी सुनक यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
निवडणुकीत होते आघाडीवर
ब्रिटनमध्ये गेले काही दिवस मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर लिझ ट्रस या ब्रिटनच्या पंतप्रधान बनल्या. पण अवघ्या 45 दिवसांत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा निवडणुकीचे वारे वाहू लागले. यामध्ये सुरुवातीपासूनच ऋषी सुनक हे आघाडीवर राहिले होते.
भारतासाठी दिवाळी गिफ्ट
माजी पंतप्रधान जॉन्सन यांनी सोमवारी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे सुनक यांचा विजय निश्चित झाला होता. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत ऋषी सुनक हे ब्रिटनचे तिसरे पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे त्यांचा हा विजय हा भारतासाठी मोठे दिवाळी गिफ्टच आहे.
Join Our WhatsApp Community