लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जाणून घ्या मुंबईतील विविध ठिकाणांचा हवेचा दर्जा

149

दिवाळीच्या सुरुवातीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेच्या दर्ज्यात गेल्या काही वर्षांपासून सुधारणा दिसून येत आहे. मुंबई आणि पुण्यात सोमवारी हवेच्या दर्ज्याची स्थिती ब-याच अंशी चांगली दिसून आली. पुण्यात हवेचा दर्जा समाधानकारक दिसून आला. तर मुंबईतही हवेचा दर्जा थोडा खराब होता. रात्री नऊनंतरही फटाके मर्यादित स्वरुपातच फोडले गेल्याचे मुंबईभरात चित्र पाहायला मिळाले. नवी मुंबई, वांद्रे-कुर्ला संकुल तसेच मालाड येथे हवेत अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण खराब असल्याचे आढळले.

नवी मुंबईत अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण इतर स्थानकांच्या तुलनेत जास्त

केंद्रीय पृथ्वी व विज्ञान संस्थेच्या पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रोपिकल मॅटिरिओलॉजी (आयआयटीएम)कडून सफर या प्रणालीच्या माध्यमातून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेचा दर्जा मोजला गेला. त्यावेळी ही माहिती समोर आली. रात्री नऊ वाजता मुंबईत हवेचा दर्जा १०८ वर दिसून आला. मुंबईतील विविध स्थानकांमध्ये अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वेगवेगळे आढळून आले. सर्वात जास्त अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण नवी मुंबईत नोंदवले गेले. नवी मुंबईत अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ३०० तर त्याखालोखाल वांद्रे-कुर्ला संकुलात २०८ आणि मालाड येथे २०४ वर नोंदवले गेले. अंधेरी आणि चेंबूर येथे हवेचा दर्जा थोडा खराब होता. अंधेरीत अतिसूक्ष्म धूलिकणांचा दर्जा १९३ तर चेंबूरमध्ये १५६ वर दिसून आला.

( हेही वाचा: Cyclone Sitrang: पूर्व किनारपट्टीवरील सितरंग चक्रीवादळाची तीव्रता वाढली, पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांना हाय अलर्ट )

वरळीतील हवेचा दर्जा सर्वात चांगला

वरळी येथे हवेचा दर्जा मुंबईतील सफर प्रणालीतील इतर स्थानकांच्या तुलनेत फारच सुधारलेला दिसून आला. वरळीत अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण केवळ ५० वर नोंदवले गेले. त्याखालोखाल भांडूप येथे अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ७५ तर बोरिवलीत ७८ वर दिसून आले. वरळीतील हवेचा दर्जा चांगला तर भांडूप, बोरिवलीतील अतिसूक्ष्म धूलिकणांचा दर्जा समाधानकारक असल्याचे सफरच्यावतीने सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.