भायखळ्यातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या त्रिकुटापैकी दोघांना भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २६ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हे दोघेही सराईत चोर असून त्यांच्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती भायखळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक खोत यांनी दिली आहे.
असा घातला दरोडा
दिनेश मुदलीयार (३८) आणि सुबय्या नायडू (४३) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघे पी.डिमेलो रोड येथील झोपडपट्टीत राहणारे आहेत. २० ऑक्टोबर रोजी रात्री भायखळा येथील बॅरिस्टर नाथ पै रोड या ठिकाणी असलेल्या विजय सर्व्हिस सेंटर, भारत पेट्रोल पंप याठिकाणी हे दोघे आपल्या आणखी एका साथीदारासह पेट्रोल पंपावर आले व त्यांनी झोपलेल्या कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण करून त्याच्याजवळ असणारी पेट्रोल पंपातील ४९ हजार रुपये रोकड लुटून पोबारा केला होता.
सीसीटीव्ही फुटेजमधून उकल
या प्रकरणी भायखळा पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक खोत,पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुहास माने, पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील आणि पथक यांनी दरोडेखोरांच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या फुटेजमध्ये संशयित आरोपी हे पोलिस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती तपास पथकाच्या हाती लागली.
दोघेही सराईत गुन्हेगार
पोलिसांनी या दोघांचा कसून शोध घेऊन या दोघांना रविवारी रात्री पायधुनी परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती खोत यांनी दिली. या दोघांच्या चौकशीत मुदलियार याच्यावर मुंबईत ३५ घरफोडीचे गुन्हे दाखल असून नायडू याच्यावर सुमारे ४८ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघांना सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता २६ ऑक्टोबर पर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
Join Our WhatsApp Community