तब्बल दोन वर्षांच्या निर्बंधानंतर मुंबईत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होताना पहायला मिळत आहे. सलग दुस-या दिवशी मुंबईतील हवेचा दर्जा पुण्याच्या तुलनेत ढासळलेला दिसून आला. मुंबईतील मालाड आणि अंधेरी या दोन्ही ठिकाणी अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण संपूर्ण दिल्ली शहराच्या वायू प्रदूषणापेक्षाही जास्त दिसून आले. दिल्ली येथील हवेच्या प्रदूषणाचा दर्जा ३४९ वर दिसून आला तर मालाड आणि अंधेरी येथे अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ३८८ आणि ३६३ वर नोंदवले गेले. तिन्ही ठिकाणी हवेच्या प्रदूषणाचा दर्जा अतिखराब असल्याचे सफर या प्रणालीने दर्शवले.
( हेही वाचा : नगरसेवकांअभावी लटकले फेरीवाल्यांचे पुनर्वसन)
दिवाळीत देशातील दिल्ली, अहमदनगर तसेच पुणे आणि मुंबईतील हवेचा दर्जा सफर या प्रणालीतून दर्शवला जातो. केंद्रीय पृथ्वी व विज्ञान संस्थेच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रोपिकल मॅटिरिओलोजी (आयआयटीएम) या संस्थेच्यावतीने सफर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मंगळवारी चारही शहरांच्या तुलनेत दिल्ली आणि त्याखालोखाल मुंबईच्या हवेच्या प्रदूषणाचा दर्जा खालावलेला होता. दिल्ली शहरात ३४९ तर मुंबईत ३०५ हवेच्या प्रदूषणाचा दर्जा नोंदवला गेला. मात्र मुंबईतील बहुतांश शहरांत मंगळवारी अतिसूक्ष्म धूलिकणांच्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
अतिसूक्ष्म धूलिकणांमुळे मुंबई शहरासाठी सफर प्रणालीत ८ स्थानकासह नवी मुंबईतील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण –
अतिखराब स्थितीत नोंदवलेली मुंबईतील स्थानके
- मालाड – ३८८
- अंधेरी – ३६३
- चेंबूर – ३२२
- माझगाव – ३१०
खराब स्थितीत नोंदवलेली मुंबईतील स्थानके
- बोरिवली २५२
- नवी मुंबई २३५
- कुलाबा २१५
ठिक स्थितीत असलेले मुंबईतील स्थानक –
- वरळी ११६