भारताच्या पूर्व किनारपट्टीवर सितरंग चक्रीवादळाने धुमाकूळ घातला असून त्याचा फटका बांग्लादेशला मोठ्या प्रमाणावर बसल्याचे दिसून येत आहे. हे चक्रीवादळ आता बांग्लादेशात पोहोचले असून ते रात्री उशिरा भारताच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे बांग्लादेशात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सितरंग चक्रीवादळ हे 24 ऑक्टोबर रोजीरात्री 11.30 वाजता ढाकाच्या 40 किमी पूर्वेला कोस्टल बांग्लादेशच्या दिशेने केंद्रित झाले आहे. या वादळाचा प्रभाव ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये देखील पावसाळी ढग तयार झाले असून ईशान्येकडील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तैनात
दरम्यान, या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन सावधगिरीच्या दृष्टीकोनातून पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. किनारपट्टीलगत असणा-या मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून रोखलं जात आहे. सितरंग चक्रीवादळाचा सर्वात जास्त धोका पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण 24 परगणा या दोन जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सतर्कता बाळगली जात आहे.
Join Our WhatsApp Community