वसईत फटाक्यांमुळे एकाच दिवसात 6 ठिकाणी आग लागल्याच्या घटना

166

देशभरात उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. तब्बल दोन वर्षांनी देशात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. अशातच आता वसईत मात्र दिवाळीच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. सोमवारी दिवसभरात वसई, विरार आणि नायगावमध्ये आग लागण्याच्या सहा घटना घडल्या आहेत. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या ठिकाणी लागल्या आगी

  • वसई पश्चिमेच्या अंबाडी रोड येथील सत्यम बंगल्यात राहणा-या शाह कुटुंबियांच्या घरातील वातानुकूलीत यंत्रणेने अचानक पेट घेतला. मात्र फटाक्यांची दुकाने आणि अग्निशमन केंद्राच्या कर्मचा-यांनी तातडीने धाव घेत मोठी दुर्घटना होण्यापासून वाचवले आहे. आगीची घटना घरातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली. येथील बंगला आणि त्याशेजारी असणा-या इमारतीमध्ये मागील तीन महिन्यांपासून विजेचा प्राॅब्लेम सुरु आहे. बिल्डिंगच्या आणि बंगल्याच्या रहिवाशांनी याबाबत महावितरणाला तक्रार दिली होती. मात्र वेळीच लक्ष न दिल्याने, एसीला आग लागल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या आगीत एका कुटुंबाच्या घराचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने ऐन दिवाळीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

( हेही वाचा: गोरेगाव येथे इमारतीच्या सातव्या मजल्याला आग )

  • सोमवारी फटाक्यांच्या ठिणगीमुळे विरारमध्ये तीन ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या. विरार पूर्वेच्या गोपचर पाडा येथे कापसाच्या गाळ्याला फटाक्याची ठिणगी लागून आग लागली होती. गोदामातील संपूर्ण कापूस जळून खाक झाला. वसई- विरार अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांनी वेळीच आग नियंत्रणात आणली.
  • विरार पूर्वेच्या मोहक सिटी येथे इमारतीच्या कन्स्ट्रक्शनसाठी वापरण्यात येणा-या बांबूच्या स्टोरेजला राॅकेटची ठिणगी पाडून आग लागली होती. येथे वसई विरार अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांनी घटनेच्या ठिकाणी तत्काळ पोहचून आग नियंत्रणात आणली.
  • विरार पश्चिमेच्या नवापूर येथेदेखील राॅकेटच्या ठिणगीमुळे एका नारळाच्या झाडाला आग लागली होती. तिथेही वसई विरार अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत आग नियंत्रणात आणली.
  • वसई पूर्वेकडील वसई फाटा येथील एका चप्पल गोदामाला भीषण आग लागली होती. रात्री 10:30 च्या सुमारास ही आग लागली होती. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, 7 टॅंकर, 2 अधिकारी आणि 16 अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहाय्याने आग विझवण्यात आली.
  • नायगावच्या टिवरी येथे नक्षत्र प्रिमायसेस या टाॅवरमधील 11 व्या मजल्यावरुन एका घराला राॅकेटमुळे आग लागली होती. रात्री 10:30 च्या सुमारास ही आग लागली. वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाकडून त्वरीत आग विझवण्यात आली. मात्र घराचे थोडे नुकसान झाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.