यंदाच्या वर्षी ऐन दिवाळीत देशभरातील खगोलप्रेमींना एका खगोलीय घटनेचे साक्षीदार होता येणार आहे. मंगळवारी देशासह राज्यातूनही खंडग्रास सूर्यग्रहण पाहता येणार आहे. भारतीयांना या ग्रहण काळात सूर्याचा केवळ 33 टक्के भाग पाहता येणार आहे. मुंबई,पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांत किती वाजता आणि किती वेळ सूर्यग्रहण दिसणार आहे त्याची माहिती जाणून घेऊया.
मुंबईत कधी दिसणार ग्रहण?
मुंबईत संध्याकाळी 4.49 पासून सूर्यग्रहण दिसायला सुरुवात होणार आहे. या ग्रहणाचा मध्यबिंदू हा 5.43 वाजता होईल. या काळात सूर्याचा 36 टक्के भाग झाकून जाणार आहे. मुख्य म्हणजे ग्रहण सुटण्याआधीच संध्याकाळी 06.08 वाजता सूर्यास्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पुण्यात ग्रहणाचा प्रारंभ हा 4.51 पासून अनुभवता येणार असून 6.31 वाजता सूर्यास्त होणार आहे.
(हेही वाचाः औरंगाबादमध्ये फटाके फोडताना दुर्घटना, 16 मुलांच्या डोळ्यांना दुखापत)
या शहरांत कधी दिसणार ग्रहण?
- नाशिक- प्रारंभ- 4.47 वा.,सूर्यास्त- 6.31 वा.
- नागपूर- प्रारंभ- 4.49 वा.,सूर्यास्त- 6.29 वा.
- कोल्हापूर- प्रारंभ- 4.57 वा., सूर्यास्त- 6.30 वा.
- औरंगाबाद- प्रारंभ- 4.49 वा.,सूर्यास्त- 6.30 वा.
- सोलापूर- प्ररांभ- 4.56 वा., सूर्यास्त-6.30 वा.
सूर्यग्रहणाचे वैशिष्ट्य
पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना एखाद्या अमावस्येला पृथ्वी आणि सूर्याच्या बरोबर मध्यभागी चंद्र येतो आणि त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडून पृथ्वीवरुन पूर्ण सूर्य पाहता येत नाही. याच स्थितीला ग्रहण असे म्हणतात. खंडग्रास सूर्यग्रहणात सूर्याचा काही भाग पाहता येत नाही. 25 ऑक्टोबर रोजी देशातील दिल्ली,राजस्थान,मध्य प्रदेश,गुजरात,महाराष्ट्र,पंजाब,उत्तर प्रदेश,उत्तराखंड,जम्मू,लेह लडाखमधून सूर्यग्रहण अनुभवता येणार आहे. भारतात यापुढील सूर्यग्रहण 2 ऑगस्ट 2027 रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community