टी-20 विश्वचषकात भारताने रविवारी पाकिस्तानवर थरारक विजय मिळवत भारतीयांची दिवाळी गोड केली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळल्या गेलेल्या या उत्कंठावर्धक सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहलीने. विराटने आपल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर 53 टेंडूत 82 धावा करत 160 धावांचे लक्ष्य गाठण्यास सिंहाचा वाटा उचलला. पण शेवटच्या षटकात झालेल्या नाट्यामुळे पाकिस्तानी संघाने मैदानातच रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली.
गोलंदाज महंमद नवाजने विराट कोहलीला टाकलेला फुलटॉस चेंडू हा अंपायरने नो बॉल म्हणून घोषित केला आणि पाकिस्तानच्या विजयाच्या आशा मावळल्या. पण तो चेंडू खरंच नो बॉल होता का? याबाबतचे नियम नेमके काय आहेत? बघूया…
नो बॉलच्या नियमांबाबत चर्चा
टीम इंडियाला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी पाकिस्तानचा लेफ्ट आर्म स्पिनर महंमद नवाज हा गोलंदाजीसाठी आला. त्याने विराट कोहलीला चौथा चेंडू हा कंबरेच्या वर फुलटॉस टाकला. या चेंडूवर कोहलीने सणसणीत षटकार हाणला. अंपायरने हा चेंडू नो बॉल ठरवला. पण पाकिस्तानी संघ हे मानायला तयार नव्हता. त्यामुळे या नो बॉलच्या नियमांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
काय आहेत नियम?
नो बॉलच्या नियमांनुसार, हाय फुल टॉ़स चेंडू तेव्हाच नो बॉल असतो जेव्हा चेंडू बॅटला स्पर्श होताना फलंदाजाच्या कंबरेवर असतो. तसेच चेंडू टोलवताना फलंदाजाने क्रीजच्या बाहेर देखील पडणं अपेक्षित नाही. पण विराट कोहलीला टाकलेल्या हा चेंडू नो बॉलच्या निकषांत पूर्णपणे बसतो. कारण विराट कोहलीचा मागचा पाय हा क्रीजमध्येच होता आणि चेंडू त्याच्या कंबरेच्या वर होता. त्यामुळे हा चेंडू नो बॉल आहे यात कोणतीही शंका नाही.
भारताचा विजय निष्कलंक
तसेच फ्री हिटवर कोहली बोल्ड झालेला असताना तो चेंडू डेड का घोष्त केला नाही असा एक वाद पाकिस्तानकडून काढण्यात येत आहे. या चेंडूवर बायच्या तीन धावा कशा मिळाल्या, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. पण फ्री हिटचा चेंडू हा सामान्य चेंडू नव्हता तर नो बॉलवर मिळालेला फ्री हिटचा चेंडू होता. त्यामुळे त्यावर कोहली बोल्ड झाला तरी तो डेड असू शकत नाही. त्यामुळे भारताचा विजय हा संपूर्णपणे खरा असून हा पाकिस्तानचा केवळ रडीचा डाव आहे.
Join Our WhatsApp Community