यंदा कोविडमुक्त दिवाळी साजरी करताना मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केलेली असून मागील तीन दिवसांमध्ये ८५ आगीच्या दुघर्टना घडल्या आहेत. त्यातील ३७ आगीच्या दुघर्टना या फटाक्यांमुळे घडल्या आहेत. त्यातील लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच ४१ आगीच्या घटना घडल्या असून २८ आगीच्या घटना या फटाक्यांमुळे लागल्याची माहिती हाती आली आहे.
( हेही वाचा : शिंदे फडणवीस सरकारकडून सर्वपक्षीय आमदारांना ‘दिवाळी भेट’ )
मागील दिवाळीच्या कालावधीमध्ये पाच दिवसांमध्ये एकूण १४१ घटना मुंबईत घडल्या आहेत. त्यापैकी ५८ आगीच्या घटना या फटाक्यांमुळे लागल्या होत्या. तर त्याआधीच्या म्हणजे सन २०२० व २०१९ या मागील दोन वर्षात अनुक्रमे ४७ आणि ३५ आगी या केवळ फटाक्यांमुळे लागल्या होत्या. परंतु यंदाच्या धनत्रयोदशीपासून ते लक्ष्मी पुजनाच्या दिनापर्यंत तीन दिवसांमध्ये एकूण ८५ आगीच्या घटना घडल्या, त्यातील ३७ आगी या फटाक्यांमुळे घडल्याची नोंद अग्निशमन दलाच्या आपत्कालिन नियंत्रण केंद्रात नोंदवली गेली आहे.
नियंत्रण कक्षातून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार सोमवारी लक्ष्मी पुजनाच्या दिवशीच ४१ आगीच्या दुघर्टना घडल्या. यादिवशी सर्वाधिक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. या आतषबाजीमुळे अनेक ठिकाणी आगी लागण्याचे प्रकार घडले असून दिवसभरांत फटाक्यांमुळे २८ दुघर्टना घडल्या. तर रविवारी म्हणजे एकूण २७ आगीच्या दुघर्टना घडल्या, त्यातील ७ घटना या फटाक्यांमुळे घडल्यामुळे लागल्या होत्या. तर धनत्रयोदशीच्या दिवशी एकूण १७ आगीच्या घटना घडल्या, त्यातील दोन आगी या फटाक्यांमुळे लागल्या होत्या,असे या आकडेवारींवरून दिसून येत आहे.
मुंबईकरांनी दिवाळीचा आनंद लुटताना फटाक्यांची आतषबाजी करताना स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घ्यायला हवी. फटाक्यांची आतषबजी करताना आसपासच्या परिसरांमध्ये त्यामुळे आग लागणार नाही याची सुरक्षेची उपाययोजना म्हणून दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये न फोडता मोकळ्या जागेमध्ये फोडले जावेत. सावध आणि सुरक्षितपणे फटाके फोडले जावेत. पर्यावरणाचादृष्टीकोनातून ध्वनी आणि वायू प्रदुषण होणार नाही याची काळजी घेत सावध आणि सुरक्षितपणे फटाके फोडले जावेत,असे मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.
दिवाळीतील फटाक्यांमुळे लागलेल्या आगी
- २२ ते २४ ऑक्टोबर २०२२ : ३७
- १ ते ५ नोव्हेंबर २०२१ : ५८
- १२ ते १७ नोव्हेंबर २०२० : ३५
- २५ ते ३० ऑक्टोबर २०१९ : ४७
यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे लागलेल्या आगी
- २२ ऑक्टोबर २०२२ : एकूण आगी १७ (फटाक्यांमुळे लागलेल्या आगी : ०२)
- २३ ऑक्टोबर २०२२ : एकूण आगी २७ (फटाक्यांमुळे लागलेल्या आगी : ०७)
- २४ ऑक्टोबर २०२२ : एकूण आगी ४१ (फटाक्यांमुळे लागलेल्या आगी : २८)