दिवाळीच्या फटाक्यांच्या वाढत्या आवाजामुळे आरेतल्या बिबट्याच्या अधिवासाला पोहोचतोय धक्का…

194

तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर मुंबईभरात दणक्यात दिवाळी साजरी होत आहे. मुंबईत सर्वत्र ठिकाणी फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जात आहेत, फटाक्यांच्या आवाजामुळे प्राणी-पक्ष्यांना दिवाळीच्या दिवसांत प्रचंड मानसिक धक्का बसतो. आरे जंगल व परिसरात सुद्धा फटाके फोडले जात आहेत, परिणामी या जंगलातील बिबट्याच्या अधिवासालाही धक्का पोहोचत असल्याने आरेत मानव-प्राणी संघर्ष वाढू शकतो, अशी भीती प्राणीप्रेमींनी व्यक्त केली.

( हेही वाचा : दिल्लीपेक्षाही मुंबईतल्या ‘या’ दोन ठिकाणांची हवा जास्तच बिघडली )

सोमवारी इतिका लोट या दीड वर्षांच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला. या घटनेनंतर मंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी कुटुंबीयांची भेट घेतली. वायकर यांना स्थानिक लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सोमवारपासून वनविभाग वणीचा पाडा, युनिट क्रमांक १५, १६, १७ सह नजीकच्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यापासून सावध राहण्यासाठी रात्री आणि सकाळी घराबाहेर पडू नका, असे आवाहन करत आहेत. आरेत जनजागृती कार्यक्रम करण्यात येत आहेत, टेहाळणी पथक रात्रंदिवस या भागांत गस्तीवर आहे. वन्यप्राणी संस्थाही वनविभागासह ठिकठिकाणी माईकच्या मदतीने सायंकाळनंतर बिबट्याच्या वावराच्यावेळी घराबाहेर पडू नका, असे सांगितले जात आहे. आरेत सध्या ८ ते १० बिबटे राहत असल्याची माहितीही मंगळवारी वनाधिका-यांनी लोट परिवार राहत असलेल्या युनिट क्रमांक १५ येथे पार पडलेल्या बैठकीत दिली. मंगळवारी हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावले गेले. यासह परिसरात कॅमेरा ट्रेपही बसवला गेला.

फटाक्यांच्या आवाजामुळे प्राण्यांची मनःस्थिती बिघडते. ते इतस्ततः भटकतात. दोन वर्ष प्राण्यांनी फटाक्यांचा फारसा आवाज ऐकलेला नाही. मुंबईभरात प्राणी-पक्ष्यांना वाढत्या फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होत आहे. आरेतही बिबट्याला या भागांत फोडल्या जाणा-या फटाक्यांच्या आवाजामुळे भयभीत होण्यासारखी स्थिती तयार झाल्याची शक्यता आहे. या स्थितीत स्थानिकांनी वनविभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

अॅड पवन शर्मा, मानद वन्यजीव रक्षक, ठाणे वनविभाग तसेच संस्थापक, रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर

अजूनही हल्लेखोर बिबट्या सापडलेला नाही. त्यामुळे आरेतील स्थानिकांनी बिबट्याच्या वावर असलेल्या वेळी सावधनता बाळगणे गरजेचे आहे. मानव-प्राणी संघर्ष कमी होण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे.

निकीत सुर्वे, बिबट्या अभ्यासक

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.