अतिक्रमण जागेतही कचरा काढायला आरे दुग्ध प्रशासनाकडून हयगय

113

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या पहाटेच आरेतील युनिट क्रमांक १५ येथे बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर याच घटनेच्या आदल्या दिवशी नजीकच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या युनिट क्रमांक १७ मध्येही बिबट्या घरात घुसण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती स्थानिकांनी वनविभागाच्या जनजागृती कार्यक्रमादरम्यान दिली. या भागांत कच-याचा ठिगारा वाढला आहे परंतु आरे प्रशासन कचरा काढायला देत नाही, अशी तक्रार स्थानिकांनी वनाधिका-यांना केली. कच-याची तातडीने साफसफाई करा, असे सांगत वनाधिका-यांनी आरे दुग्ध प्रशासनाची याबाबत बोलून अंतिम कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन स्थानिकांना दिले. याबाबत आरे दुग्ध प्रशासनाकडून भूमिका समजू शकली नाही.

(हेही वाचा – … म्हणून ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे ठरली निकामी!)

आरे दुग्ध प्रशासनाने काही वर्षांपूर्वी ही जागा कर्मचा-यांना राहायला दिली होती. मात्र परिवाराचे सदस्य वाढताच या भागात स्थानिकांकडूनच अतिक्रमण झाले. १९६५ साली युनिट क्रमांक १७ मध्ये केवळ ३० ते ४० पाडे होते. आता या भागांत जवळपास ८० घरांची वस्ती झालेली आहे. या घरांच्या कडेला मोकळ्या जागेत प्रचंड कचरा साठला आहे. कच-याचे व्यवस्थापन होत नसल्याने अगदी घराच्या दरवाज्यापर्यंत बिबट्या रविवारी येऊन गेला, आत शिरण्याच्या प्रयत्नांत असताना आम्ही कसेबसे वाचलो, अशी माहिती महिलेने वनाधिका-यांना दिली. वाढत्या अतिक्रमणग्रस्तांना या भागांत पुरेशी वीज आणि घरात प्रसाधनगृहांची उपलब्धता करुन द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पाड्याच्या एका टोकाला स्थानिकांनी स्वतःहून सौरउर्जेवर चालणारे वीजेचे एक खांब लावले आहे. मात्र सध्या ते बंद पडल्याची माहिती स्थानिक रहिवासी विनोद पाटील यांनी दिली.

कच-याचा परिसर…

युनिट नंबर १७ जवळ वसलेल्या जवळपास संपूर्ण परिसरातच कचरा व्यवस्थापनाची मोठी अडचण निर्माण झाल्याचे हिंदूस्थान पोस्टच्या पाहणीत दिसून आले. केल्टीपाडा, दामूचा पाडा तसेच युनिट नंबर १८ जवळही कच-याचा ढीग पाहायला मिळाला. बिबट्याच्या अधिवास क्षेत्रात कच-याचे व्यवस्थापन महत्त्वाचे असते. कच-यातील अन्न खायला कुत्रे येतात. कुत्रे हे बिबट्याचे आवडते व सहज मिळणारे भक्ष्य असते. त्यामुळे कचरा व्यवस्थापनावर आरेत बिबट्यामुळे पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अतिक्रमणाच्या समस्येचे निराकरण करा

युनिट क्रमांक १५, १६, १७ या वस्त्यांमध्ये अतिक्रमण आहे. यासह युनिट क्रमांक २२, १९ आणि मॉडर्न बेकरीचा परिसर या भागांतही आता अतिक्रमण वाढू लागले आहे. युनिट क्रमांक ७ आणि १३ तसेच आदर्श नगरच्या डोंगरपरिसरात सर्वात जास्त अतिक्रमण वाढले आहे. अतिक्रमणग्रस्तांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी आहे. जंगलातील मूळ आदिवासी बिबट्याला देव मानतो. आम्हांला वन्यजीवांच्या वावराचा त्रास नाही. परंतु अतिक्रमण जंगलातून काढल्यास संघर्षाची परिस्थिती टाळता येईल, असे आदिवासी हक्क संवर्धन समितीचे कार्यकर्ता, प्रकाश भोईर यांनी सांगितले.

कचरा व्यवस्थापनासह, स्थानिक तबेल्यांत वीजेची सुविधा तसेच इतर बाबी उपलब्ध होण्याबाबत आम्ही आरे दुग्ध व्यवस्थापन तसेच पालिकेशीही चर्चा करत आहोत. मानव-प्राणी संघर्ष टाळण्यासाठी सर्वतोपरि उपाययोजना करण्यात आम्ही प्रयत्नशील असल्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच मुख्य वनसंरक्षक, ठाणे वनविभाग (प्रादेशिक) (अतिरिक्त कार्यभार) संचालक व वनसंरक्षक जी. मल्लिकार्जून यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.