शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनावर बंदी घालण्याची मागणी विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. यासंदर्भात रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडियाकडे (आरएनआर) ते तक्रार करणार आहेत.
( हेही वाचा : दिवाळीच्या फटाक्यांच्या वाढत्या आवाजामुळेही आरेतल्या बिबट्याच्या अधिवासाला पोहोचतोय धक्का… )
‘सामना’मधून रश्मी शुक्ला यांच्याबाबत सुरू असलेल्या वृत्तांकनाचे कारण सदावर्ते यांनी पुढे केले आहे. ‘दैनिक सामनामधून महिला पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे अप्रत्यक्षरित्या खच्चीकरण केले जात आहे. त्यामुळे या वृत्तपत्रावर तत्काळ बंदी घालण्यात यावी’, असे त्यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेले सामना हे वर्तमानपत्र शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखले जाते. किंबहुना ते शिवसेनेच्या प्रचारतंत्राचा मुख्य कणाही आहे. एकीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले असताना, आता सामनावर बंदीची टांगती तलवार आल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असू शकतो.
प्रकरण काय?
- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला अडचणीत आल्या होत्या. अलिकडेच शिंदे-फडणवीस सरकारने रश्मी शुक्ला यांना क्लिनचिट दिली. त्यानंतर सामनामधून शुक्ला यांच्यावर टीकासत्र सुरू आहे. त्याचा आधार घेत ‘सामना’वर बंदी घालण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
- मी यासंदर्भात आरएनआय कार्यालय (रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया) आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे. राज्यातील गृह मंत्रालयानेही त्याची दखल घ्यावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
- दरम्यान, सामनावर कोणीही बंदी आणू शकत नाही. त्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागेल. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांची मागणी केवळ प्रसिद्धीसाठीचा खटाटोप असल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.