एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने मुंबई हादरली आहे. या मुलीवर फोर्ट मधील एका लॉजच्या खोलीत टॅक्सी चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना समोर आली असून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी टॅक्सी चालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली असून त्याच्या सहकाऱ्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
( हेही वाचा : ‘सामना’वर बंदी घाला, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी)
अल्पवयीन मुलगी ही १५ वर्षांची असून तिच्यावर हा प्रसंग दुसऱ्यांदा ओढवला आहे. यापूर्वी तिच्यावर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर बाल महिला आयोगाकडून या मुलीला माटुंगा येथील एका महिला बाल आश्रमात ठेवले होते. परंतु मुलगी या आश्रमात राहण्यास तयार नव्हती, त्यामुळे महिला बाल आयोगाने या मुलीला नायर रुग्णालयात दाखल केले होते. २१ऑक्टोबर रोजी पीडित मुलीने नायर रुग्णालयातून पळ काढला आणि ती मुंबई सीएसएमटी येथे आली होती.
दुसऱ्या दिवशी एका टॅक्सी चालकाने तिला एकटे बघून तिच्याकडे चौकशी केली. टॅक्सीत बसवले व तुला नोकरी मिळवून देतो असे सांगून तो तिला फोर्ट मधील एका लॉजवर घेऊन आला व त्याने आपल्या एका मित्राला लॉजवर बोलावून घेतले. त्या ठिकाणी टॅक्सी चालक आणि त्याचा मित्र या दोघांनी मुलीवर अत्याचार केला, व तिला पुन्हा टॅक्सीत बसवून सात रस्ता या ठिकाणी सोडून पळ काढला. पीडित मुलीने आग्रीपाडा पोलीस ठाण्याला येऊन तक्रार दाखल केली. आग्रीपाडा पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून बाल महिला आयोगाला याबाबत कळवले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ही हद्द माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे हा गुन्हा पुढील तपासासाठी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी सामूहिक अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून टॅक्सी चालकाला अटक केली असून दुसऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community