अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिरात देवाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जानेवारी 2024 मध्ये भाविकांसाठी मंदिर खुले होणार आहे. मंदिराच्या बांधकामावर देखरेख ठेवणाऱ्या समितीच्या सदस्यांनी आज मंगळवारी ही माहिती दिली.
(हेही वाचा – आरेत बिबट्या जेरबंद, वनविभागाला यश)
या समितीचे सरचिटणीस चम्पत राय यांनी सांगितले की, राममंदिराचे 50 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे आणि बांधकामाची प्रगती समाधानकारक असल्याचे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने सांगितले. मकर संक्रांतिच्या दिवशी मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये मंदिर भाविकांसाठी खुले केले जाईल. पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत मंदिराच्या तळमजल्याचे बांधकाम होऊन तो सज्ज होईल आणि जानेवारी 2024 च्या सुमारास राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. राममंदिराच्या बांधकामावर 1800 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे तसेच प्रमुख हिंदू संतांच्या मूर्तींसाठी येथे जागा उपलब्ध केली जाईल, असे राय यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी केलेल्या ठिकाणांवर आज मंगळवारी पत्रकारांना नेण्यात आले. योजनेनुसार राममंदिर परिसरातील 70 एकर जागेत वाल्मीकि, केवट, शबरी, जटायू, माता सीता, गणेश आणि शेषावताराचे मंदिरही उभारले जाणार आहे. येथे आयाताकृती दोन मजली परिक्रमा मार्गही बांधला जात आहे. यात मंदिराचा परिसर आणि त्याच्या प्रांगणासह एकूण 8 एकर जागेचा समावेश आहे. त्याच्या पूर्वेकडील भागात वाळूच्या दगडापासून बनवलेले प्रवेशद्वार असेल. मंदिराच्या गर्भगृहात राजस्थानातील मकराणा टेकड्यांवर आढळणारा पांढरा संगमरवर वापरला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community