कोरोना साथरोगामुळे तब्बल 2 वर्ष प्रभावित राहिलेल्या देशातील सराफा बाजाराला यंदाच्या दिवाळीने झळाळी आली आहे. यावर्षी देशात सोने-चांदीच्या बाजारात सुमारे 25 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
(हेही वाचा – Vodafone Idea युजर्सला झटका! नेटफ्लिक्स, हॉटस्टार सुविधा मोफत देणारा ‘हा’ प्लॅन बंद)
यासंदर्भात एआयजेजीएफने वर्तवलेल्या अंदाजानुसार धनत्रयोदशीला सोन्या-चांदीच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले. त्याशिवाय गोल्ड बारच्या विक्रीनेही यावेळी उच्चांक प्रस्थापित केले. एआयजेजीएफच्या अंदाजानुसार दोन दिवसांच्या धनत्रयोदशीदरम्यान, देशामध्ये सोने-चांदीची नाणी, मूर्ती आणि भांड्याच्या विक्रीमधून सुमारे 25 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. शनिवार 22 ऑक्टोबर आणि रविवार 23 ऑक्टोबर यादरम्यान, देशभरातील बाजारांमध्ये गर्दी दिसून आली.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या महासचिवांनी सांगितले की, कोविडच्या साथीमुळे बाजारामध्ये दोन वर्षे मंदी होती. त्यानंतर बाजारामध्ये ग्राहकांच्या गर्दीने व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर सोने आणि सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. यावर्षी दिवाळीत कोरोनाचे कुठलेही निर्बंध नसल्याने बाजारांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. आता दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये सोन्याची विक्री वाढण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community