महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळतो. सरकारी कर्मचाऱ्यांना ३८ टक्के महागाई भत्ता झाला असून, एसटी कर्मचाऱ्यांना अजून २८ टक्के इतकाच महागाई भत्ता मिळत आहे.
(हेही वाचा – शेतकरी कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांची दिवाळी; म्हणाले, “धीर सोडू नका…”)
दरम्यान, प्रलंबित महागाई भत्ता तत्काळ मिळण्यासाठी सरकारने निधी द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.
काय आहे पत्र
पूर्वी महामंडळाने ७३८.५० कोटी रुपये निधीची मागणी सरकारकडे केली होती, परंतु त्यापैकी पहिल्यांदा ३४५ कोटी रुपयेच महामंडळाला मिळाले. मागणी केलेली रक्कम मिळाली नसल्याने वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. सरकारने मागणी केलेला निधी दिला असता, तर तो प्रश्न मिटला असता, असे बरगे यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात एक चांगला योगायोग झालेला आहे. मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष स्वतः एकनाथ शिंदे हे आहेत. पूर्वी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष असे चार स्तर असायचे. त्यामुळे फाईल मंजुरीसाठी खूप वेळ लागायचा. सुदैवाने या एसटीच्या अडचणीच्या काळात या दुर्मिळ योगायोगाचा फायदा होईल, अशी अपेक्षा व भावना कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.