राज्यातील राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर राज्याचे राजकारण पूर्णतः बदलल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेवर टीका करण्यास सुरूवात केली होती. शिवसेनेवर केलेल्या या टीकेनंतर राष्ट्रवादीने शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. मात्र शिंदे गटातील शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीला थेट इशारा दिल्याचे समोर आले आहे.
काय म्हणाले शंभूराज देसाई
राष्ट्रवादीला आणखी दहा ते पंधरा वर्ष सत्तेसाठी तळमळत बसावे लागेल. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही, जर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस सत्तेत आली तर लोकशाही टिकली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेतून बाजूला गेली की, लोकशाही धोक्यात आली, असे रामराजे म्हणाले. तर मला रामराजेंना सांगायचे आहे की आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो. लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केले आहे. लोकशाही मार्गानेच सभापतींची निवड केली आहे. आपणही विधानपरिषदेचे सभापती होता.
(हेही वाचा – अध्यक्ष बनताच खर्गेंनी स्थापन केली काँग्रेसची नवी समिती, थरुरांचा पत्ता कट)
दरम्यान, हजारोंच्या मतांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला तुम्ही निवडून येणार नाही, असे सांगणाऱ्या मेहबूब शेख यांनी राष्ट्रवादी प्रवक्तेपद सोडून कुंडलीवरून भविष्य बघायचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे का, असा सवाल देसाईंनी केला आहे. राष्ट्रवादीने कितीही ताकत लावली तरी येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत दूध का दूध पानी का पानी होईल, असे प्रतित्त्युतर राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शेख यांनी दिले आहे.