भारतीय चलनाचा ‘असा’ आहे रंजक इतिहास

184

भारतीय चलनावर कोणाचा फोटो असावा, यावरुन सध्या वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय चलनाचा प्रवास कसा आहे, ते जाणून घेऊया.

जो रुपया तुमच्या खिशात, बँक लॉकर्समध्ये किंवा शेअर बाजारात गुंतवलेला आहे, त्याची कहाणी शतकानुशतके जुनी आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी चलन वापरणाऱ्या मोजक्या देशांपैकी भारत एक आहे, असे मानले जाते. चांदीच्या नाण्यांबरोबरच सोन्याची नाणीही तेव्हा वापरात होती, ज्यांना मोहर म्हणून ओळखले जात होते.

19 व्या शतकात पैसा (आणा) हे सर्वात लहान चलन होते. 19 व्या शतकात बँक ऑफ हिंदुस्तानने कागदी नोटांची सुरुवात केली होती. रुपयाचा इतिहास जवळून जाणणारे लोक सांगतात की, 1861 मध्ये 10 रुपयांची नोट पहिल्यांदा बाजारात आली होती. 1864 मध्ये 20 रुपयांची नोट आली. 100 रुपयांची नोट 1900 मध्ये आली आणि 50 रुपयांची नोट 1905 मध्ये भारतात आली. तसेच, 1907 मध्ये 500 रुपयांच्या नोटा, तर दोन वर्षांनंतर 1909 मध्ये 1000 च्या नोटा बाजारात आल्या.

10 हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्या

1950 मध्ये 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नवीन नोटा आल्या. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारत सरकार नोटा छापत असे. रिझर्व्ह बँक 1938 मध्ये अस्तित्वात आल्यानंतर बँकेने पहिली 5 रुपयांची नोट जारी केली. त्याच वर्षी 100, 1000 आणि दहा हजाराच्या नोटा जारी करण्यात आल्या.

भारतीय चलनावर विविध चित्रे

एक काळ असा होता की दोन रुपयांच्या नोटेवर वाघाचे चित्र होते, पाच रुपयांच्या नोटेवर सांबर हरण आणि हरिणाचे चित्र होते, तर 100 रुपयांच्या नोटेवर शेतीचे आकृतिबंध चित्र होते, तर 10 आणि 20 रुपयांच्या नोटेवर कोणार्क, मोर आणि शालिमारचे चित्र होते.

अशोक स्तंभ असलेले चलन

भारताच्या रुपयाचा प्रवास हा वैविध्यपूर्ण आहे. म्हणजेच, प्रत्येक टप्प्यावर भारतीय चलनात बदल करण्यात आले आणि ते आजही सुरक्षिततेच्या कारणास्तव केले जात असल्याचे आपण पाहतो. भारतीय चलनाची सुरक्षा वैशिष्ट्ये सतत अपग्रेड होत आहेत. स्वातंत्र्यानंतर नवीन नोटांवर अशोक स्तंभ चिन्हाऐवजी गांधींचे चित्र कोरण्यात यावे, असे ठरवण्यात आले होते. मात्र, नंतर अशोक स्तंभच नोटांवर छापण्याचे ठरले.

( हेही वाचा: ATM मधून चक्क खेळण्यातील नोट निघाल्याने खळबळ )

नोटबंदीनंतर 2000 रुपयांची नोट बाजारात

1969 मध्ये गांधींच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय चलनावर गांधींचे चित्र छापण्यात आले. त्यानंतर नोटेवर गांधीजींसोबत सेवाग्राम आश्रमाचे चित्र दाखवण्यात आले. यानंतर 1987 मध्ये गांधींचे चित्र असलेली 500 रुपयांची नोट बाजारात आली, परंतु नोटेचे वॉटर मार्क अशोक चिन्ह राहिले. 1996 मध्ये गांधी मालिकेच्या नवीन नोटा नवीन वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आल्या. 2005 मध्ये आणखी काही वैशिष्ट्ये जोडण्यात आली. 2011 मध्ये रुपयाचे चिन्ह नव्याने आणले गेले आणि 2016 मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर 2000 रुपयांची नोट बाजारात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.