शिंदे गटाच्या आमदारांना भाजपमध्ये घेणार? भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचं स्पष्टीकरण

148

शिंदे गटातील काही नाराज आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा वृत्त ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून देण्यात आले होते. त्यामुळे भाजप आता शिंदे गटही फोडणार का, अशा चर्चांना सुरुवात झाली होती. पण त्यातच आता भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

शिंदे गटातील आमदारांना भाजपमध्ये घेण्याचं कोणतंही कारण नाही. कारण आता आम्ही दोघंही एकत्र राज्यात सत्तेत आहोत. आम्ही एकत्र सरकार चालवतोय, असं केंद्रीय मंत्री दानवे यांनी म्हटलं आहे.

शिंदे गट फोडण्याचा प्रश्नच नाही

महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वादामुळे सरकार पडलं. त्यामुळे त्याचा दोष भाजपला देता येणार नाही. आपल्या पक्षातील पराभूत आमदारांना शिवसेना आमदारांच्या विरोधात एकत्र आणण्याचं काम काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटातील आमदारांनी उठाव केला. पण आता शिंदे गटातील आमदारांना भाजपमध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही. कारण आम्ही दोघंही राज्यात एकत्र सरकार चालवतोय, असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे.

(हेही वाचाः भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ऐतिहासिक निर्णय, खेळाडूंच्या मानधनाबाबत बीसीसीआयची मोठी घोषणा)

बोलण्याने कोणीही मुख्यमंत्री होत नाही

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात येत आहे. त्यावर सुद्धा दानवे यांनी भाष्य केलं आहे.हा सगळा संख्याबळाचा खेळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जर का स्वबळावर निवडणूक लढली आणि त्यांच्याकडे अपेक्षित संख्याबळ असेल तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात. लोकशाहीत ज्यांच्याकडे संख्याबळ जास्त असतं तो राजा असतो. मोदी सुद्धा आपल्या संख्याबळाच्या जोरावर पंतप्रधान पदावर आहेत. एकनाथ शिंदे यांनाही भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पद मिळालं. त्यामुळे संख्याबळाला महत्व आहे. कुणाच्या बोलण्याने कोणीही मुख्यमंत्री होत नसतो, असा खोचक टोला दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.