नगरसेवकांशिवाय महापालिकेत विकासाची कामे अशक्यच; अधिकारी म्हणतात,लवकरच महानगरपालिका अस्तिवात यावी!

162
लोकशाही व्यवस्थेत अधिकाऱ्यांच्या हाती दीर्घकाळ सत्ता राहणे चुकीचे असते. मुंबई महापालिकेसह सर्वच महापालिकांवर प्रशासकांची राजवट जास्त का राहता कामा नये असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पालिकांमध्ये प्रशासकांची दीर्घकाळ राजवट अयोग्यच असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले असले तरीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही आता असेच वाटू लागले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही नगरसेवकांची निवड लवकर व्हावी, सार्वत्रिक निवडणूक लवकर  व्हाव्यात असे वाटत आहे.  प्रशासन आणि जनतायामध्ये  नगरसेवक हे दुवा म्हणून काम करत असतात आणि नगरसेवकांच्या माध्यमातूनच प्रशासनाला चांगली कामे पुढे नेता येत असतात. त्यामुळे  लवकरात लवकर महापालिका अस्तित्वात येण्यासाठी सार्वत्रिक निवडणूक व्हाव्यात अशी तीव्र इच्छा आता महापालिकेचे अधिकारी खासगीत व्यक्त करताना ऐकायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेचा कालावधी ०७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर महापालिका आयुक्त यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका प्रशासकांची नियुक्ती हे केवळ सहा महिन्यांकरता अपेक्षित मानली जात असली तरीही राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार मुंबई महापालिकेच्या प्रशासकांची नियुक्ती ही पुढील महापालिका अस्तित्वात येईपर्यंत राहील असे नमूद केले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवरील प्रशासकांची राजवट ही पुढील निवडणूक होईपर्यंत आणि त्यात निवडून आलेल्या नगरसेवकांच्या माध्यमातून महापालिका अस्तित्वात येईपर्यंत  प्रशासकांच्या हाती महापालिकेचा कारभार असेल.  त्यामुळे ०७ मार्चनंतर नगरसेवकांचा हस्तक्षेपाशिवाय प्रशासक हे मुंबईच्या विकासाची  कामे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र  नगरसेवकांच्या माध्यमातून जी विकास कामे केली जातात, त्या तुलनेत प्रशासनाला आपली काम पुढे नेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नगरसेवक आपल्या विभागातील समस्यांसह विविध  विकास कामे घेऊन येत असतात आणि ती विकास कामे करून घेण्यासाठी पाठपुरावा करत असतात.  प्रशासन आपल्याला योग्य त्याच विकास कामांची पूर्तता करत असले तरीही परंतु मुंबईच्या दृष्टिकोनातून विकासाची कामे किंवा अन्य प्रकल्प, पायाभूत सेवा सुविधांची कामे जलदगतीने करताना अडचणी येतात  नगरसेवक हा जनता आणि प्रशासन यांच्यामध्ये दुवा असल्याने विकास कामे करण्यासाठी तो वारंवार पाठपुरावा करत असतो आणि त्यामुळेच विभागातील विकासाची कामे ही पुढे रेटली जातात. कदाचित याचे श्रेय नगरसेवकांना मिळत असलं तरीही नगरसेवक हे या विकास कामांचे श्रेय घेण्यास पात्र असतात. गेल्या सात मार्चनंतर ज्याप्रकारे प्रशासक म्हणून अधिकारी काम करत असले तरी नगरसेवकांची उणीव ही सातत्याने जाणवली जात असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.
नगरसेवक नसल्याने या प्रशासकीय राजवटीत प्रशासनाला काम करताना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जाऊ लागतं याचं एक अनुभव  अधिकाऱ्यांना येत आहे. बरीच विकास कामे ही जनतेला अभिप्रेत असल्याने काही ठिकाणी जनतेचा रोष असल्यास त्यांची समजूत काढून तथा त्यांना विश्वासात घेऊन ती कामे किती आवश्यक आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न नगरसेवक करतात. त्यामुळे  प्रशासनाला ती विकास कामे करून घेण्यात फार मोठी मदत होते. पण प्रशासक आल्यापासून अशी काही कामे करताना, लोकांचा रोष पाहता  प्रशासनाला बहुतांशी ठिकाणी कामांना गती देता आलेली नाही. त्यामुळेच निवडणूक होऊन नगर महापालिका अस्तित्वात यावी अशी आता तीव्र भावना काही अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकांमध्ये प्रशासकांची दीर्घकाळ राजवट अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे आता महापालिकांमधील अधिकाऱ्यांना  निवडणुकीचे वेध लागले असून महापालिका अस्तिवात आल्यास नगरसेवकांच्या मदतीने खऱ्या अर्थाने मुंबईच्या पायाभूत सेवा आणि सुविधा यासह विकास प्रकल्पाची कामे करणे अधिक चांगले होईल,असाही विश्वास अधिकारी व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे आधी नगरसेवकांच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत तक्रार करणाऱ्या अधिकाऱ्यांना नगरसेवकांचे महत्व समजू लागले आहे, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.