‘सरडा नेमका कोण आणि मातोश्रीवर बसलेला कोण ते कळेल’, मनसेचे पेडणेकरांना प्रत्युत्तर

142

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनसेच्या नेत्यांमधील वाद आता चांगलाच पेटला आहे. मनसे सरड्यासारखे रंग बदलणारा पक्ष असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केल्यानंतर आता मनसेकडूनही त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आधी स्वतःकडे बघितलंत तर सरडा नेमका कोण आणि मातोश्रीवर बसलेला कोण हे कळेल, अशी टीका गजानन काळे यांनी किशोरी पेडणेकरांवर केली आहे.

याशिवाय त्यांची दिवाळी गोड होत नाही

मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन हा शब्द इंग्रजी किंवा देवनागरीमध्ये लिहिता,वाचता किंवा बोलता न येऊ शकणा-या मुंबईच्या सर्वश्रेष्ठ माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिवाळीत देखील मनसे,राज ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय दिवाळीचा फराळही गोड वाटेनासा झाला आहे. त्यांच्या शिल्लक सेनेचे प्रमुख कधी भाजपसोबत युती करतात, कधी पटलं नाही म्हणून स्वतंत्र लढतात, परत भाजपचं सरकार आलं की परत पाठिंबा देऊन सत्तेसाठी मंत्रीपदं आमच्या घशात घालून घेतात.

(हेही वाचाः ‘मनसे सरडाही लाजेल इतके रंग बदलणारा पक्ष’, पेडणेकरांची टीका)

सरडा नेमका कोण ते कळेल

ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली त्यांच्यासोबत हे छय्याछय्या करतात आणि त्यांच्यासोबत सत्तेत जाऊन शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन म्हणून स्वतः मुख्यमंत्री होतात आणि आदि बाळाला त्यात मंत्रीपद देतात. इतकंच नाही तर आता एमआयएम आणि समाजवादी पक्ष यांच्यासोबतही हे युती करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आधी स्वतःकडे बघा म्हणजे सरडा नेमका कोण आणि मातोश्रीवर बसलेला तो कोण आहे? , हे नक्कीच कळेल, अशी बोचरी टीका गजानन काळे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर केली आहे. तसेच आता महाराष्ट्रातील जनतेने शिल्लक सेनेला गांभीर्याने घेणं सोडलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.