स्वतःची गरिबी दूर करण्यासाठी आईच्या कुशीत झोपलेल्या अडीच महिन्यांच्या मुलीची चोरी करून तिची विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका दाम्पत्याला आझाद मैदान पोलिसांनी अटक करून या दोघांच्या तावडीतून चोरलेल्या मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
( हेही वाचा : मुंबईत वातानुकूलित बेस्ट बसला भीषण आग )
आईच्या कुशीत झोपलेल्या अडीच महिन्यांच्या मुलीची चोरी
आफ्रिन आणि मोहम्मद हनीफ इकबाल मेमन असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. अफ्रिन आणि मोहम्मद हे दोघे अँटॉप हिल येथील एका झोपड्यात राहत आहेत, या दोघांना दोन लहान मुले आहेत. मुंबईतील सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयाच्या समोरील फुटपाथवर झोपणाऱ्या एका आईच्या कुशीतून अडीच महिन्यांची मुलगी बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरीला गेली होती. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. पोलिसांची आठ विविध पथके तयार करण्यात आली.
पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही फुटेज तसेच रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित इसम सीएसएमटी रेल्वे स्थानकातून हार्बर मार्गावरून एक लहान मुलं सोबत घेऊन ट्रेन मध्ये चढताना दिसला. तपास पथकाने हार्बर मार्गावरील प्रत्येक रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर संशियत इसम गुरु तेग बहाद्दूर नगर रेल्वे स्थानकात उतरल्याचे दिसले. तपास पथकाने गुरु तेग बहाद्दूर नगर, अँटॉप हिल, प्रतीक्षा नगर, वडाळा परिसरात या इसमाचा शोध घेतला असता सदर इसम हा अँटॉप हिल येथील झोपड्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
अपहरणाचा गुन्हा दाखल
पोलिसांनी तात्काळ या झोपडपट्टीत शोध घेऊन या दाम्पत्याच्या तावडीतून चोरलेल्या मुलीची सुटका करून या दाम्पत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता मोहम्मद हनीफ इकबाल मेमन आणि अफ्रिन अशी या दोघांची नावे असून त्यांनीच या मुलीची चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेल्या मुलीची विक्री करून त्यापैशातून गरिबी दूर करण्याच्या चेहेतूने त्यांनी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली. आझाद मैदान पोलिसांनी या दोघांना याप्रकरणी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community