भाजपने आपला उमेदवार मागे घेतल्यानंतर बहुचर्चित अशा अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या चर्चा आता बंद झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या सहज विजयी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण आता याचबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे.
निवडणुकीतून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचे सांगत एका अपक्ष उमेदवाराने ही निवडणूक रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता याबाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक रद्द झाल्यास ठाकरे गटाचे टेन्शन वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाला पत्र
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या बिनविरोध निवडून येतील असे बोलले जात होते. पण या निवडणुकीसाठी अनेक अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकत नाही. यापैकीच एक अपक्ष आमदार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे.
आयोगाने घेतली दखल
या पत्रात त्यांनी ठाकरे गटाकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे निवडणूक आयोगाला केली आहे. निवडणूक आयोगाने देखील कांबळे यांच्या या पत्राची दखल घेतली असून त्यावर आयोग काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Join Our WhatsApp Community