मृत्यू झालेला तरुण अचानक तिरडीवर उठून बसल्याने त्याला जीवनदान मिळाल्याची अंधश्रद्धा अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या विवरा गावात घडली आहे. बाबाच्या मंत्रोच्चाराने मेलेला तरुण जिवंत झाल्याची अफवा मुलाच्या कुटुंबीयांनी आणि बाबाने उठवली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यानंतर सत्य समोर आले आहे.
विवरा गावात राहणारा चान्नी पोलिस स्थानकातील होमगार्ड प्रशांत मेसरे हा गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. त्याच्यावर डॉक्टरांचे उपचार सुरू होते. प्रशांतवर कोणीतरी काळी जादू केल्याच्या संशयातून त्याच्या कुटुंबीयांनी गावातीलच एका 21 वर्षीय कथित बाबाकडूनही त्याच्यावर तंत्र-मंत्राचे उपचार सुरू होते.
काय घडला प्रकार?
बुधवारी मेसरे कुटुंब प्रशांतसह बुलढाण्यातील अमरापूर येथे देवदर्शनाला गेले असता तिथे अचनाक प्रशांतची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला खामगाव येथील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी सलाई लावल्यावर प्रशांत बरा होईल असे सांगितले. पण प्रशांतच्या कुटुंबीयांनी त्याला थेट आपल्या मूळगावी विवरा येथे आणले.
घरी आल्यानंतर दुपारी अचानक प्रशांतची हालचाल बंद झाली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची बातमी गावात पसरली. त्यानंतर त्याच्या घरी लोकांची गर्दी गोळा झाली आणि प्रशांतला त्यांनी तिरडीवर ठेवले. तसेच त्याला गावातील एका बाबाकडे नेण्यात आले. तेव्हा बाबाने त्याच्यावर मंत्रोपचार सुरू केला आणि काही वेळातच प्रशांत तिरडीवर उठून बसला. त्यामुळे बाबांनी चमत्कार करुन प्रशांतला जिवंत केल्याची चर्चा गावभर होऊ लागली.
पोलिसांनी केला प्रकार उघड
पण या घटनेबाबत चान्नी पोलिस स्थानकाचे पोलिस उप निरीक्षक गणेश महाजन यांना संशय आला. त्यांनी गावात जाऊन विचारपूस केली असता संपूर्ण प्रकरणाला उलगडा झाला. पोलिसांनी प्रशांतच्या कुटुंबीयांना प्रश्न विचारताच प्रशांतचे कुटुंबीय निरुत्तर झाले. त्यानंतर पोलिसांनी प्रशांत, त्याचे कुटुंबीय आणि कथित बाबाला चौकशीसाठी पोलिस स्थानकात नेले. तेव्हा डॉक्टरांनी प्रशांतला मृत घोषित केल्याचा पुरावा द्यावा, अशी मागणी पोलिसांनी केली. तेव्हा प्रशांतचे कुटुंबीय हा पुरावा सादर करू शकले नाहीत. यानंतर पोलिसांनी प्रशांत, त्याचे कुटुंबीय आणि बाबवर गुन्हा दाखल केला आहे.
Join Our WhatsApp Community