शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने राज्यभर दौरे करून बंडखोर आमदारांना शिंगावर घेणाऱ्या भास्कर जाधव यांची तोफ रत्नागिरीतच रोखण्यासाठी शिंदे गटाने व्यूहरचना आखली आहे. उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर त्याची जबाबदारी देण्यात आली असून, रामदास कदम त्यांच्या दिमतीला असतील.
सध्या शिवसेनेत असलेले भास्कर जाधव गेल्या अनेक वर्षांपासून गुहागर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि पुन्हा शिवसेना, असा त्यांचा राजकीय प्रवास सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी उठाव केल्यानंतर बंडखोरांविरोधात त्यांनी टीकेची राळ उठवली आहे. महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करून ते शिंदे गटाला आव्हान देत आहेत.
त्यामुळे भास्कर जाधवांची तोफ रत्नागिरीत किंबहुना गुहागर मतदारसंघात रोखण्यासाठी शिंदे गटाने व्यूहरचना आखली आहे. त्यासाठी सहदेव बेटकर यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा शिलेदार गळाला लावून जाधव यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचा शिलेदार लावला गळाला
कुणबी मतदारांत सहदेव बेटकर यांचा प्रभाव आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पायाला भिंगरी लावून रत्नागिरी जिल्ह्यात फिरायला सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी ५२ हजार मते घेत त्यांनी दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. भास्कर जाधव यांना या निवडणुकीत ७८ हजार मते मिळाली होती. आता बेटकर यांना पालकमंत्री उदय सामंत आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या रूपाने बळ मिळणार असल्यामुळे भास्कर जाधव यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहणार आहे.
कार्यकर्त्यांमध्ये पकड आणखी घट्ट करण्यासाठी सहदेव बेटकर यांना महामंडळ देण्यासंदर्भात शिंदे गटात विचार सुरू आहे. उदय सामंत त्यासाठी आग्रही असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा सुरू केल्याचे कळते. परिणामी, इतके तगडे आव्हान उभे ठाकल्यामुळे भास्कर जाधव यांना गड शाबूत राखण्यासाठी दौरे सोडून मतदारसंघात रहावे लागेल, अशी ही रणनीती आहे.
Join Our WhatsApp Community