महाविकास आघाडी सरकारने कोरोनामुळे २०२० आणि २०२१ मध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचे टाळले होते. यंदा मात्र १९ डिसेंबरपासून किमान दोन आठवड्यांचे हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वीच करण्याचे संकेत दिले असून, विधिमंडळ प्रशासनाने तशी तयारी सुरू केली आहे.
अधिवेशनासाठी विधानभवन, रविभवन, नागभवन, आमदार निवास आणि १६० खोल्यांचे गाळे सज्ज करण्यात येत आहेत. त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसह रंगरंगोटीची कामे करण्यात येणार असून रस्त्यांचीही डागडुजी केली जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांपूर्वीच अधिवेशनाच्या तयारीबाबत आढावा घेतला असून खर्चाचा अंदाज देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
या अधिवेशनासाठी ९५ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. येत्या सोमवारपासून नियोजन विषयक कामे सुरू होणार आहेत. बांधकाम विभागाकडून (PWD) खर्चाचा आराखडा अंतिम करण्यात आला असून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मागील अधिवेशनाच्या तुलनेत ३० कोटींचा जास्त खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. नागपुरात होणारे अधिवेशन सहा आठवड्यांचे घेण्याचा करार आहे. परंतु गेल्या काही दशकांचा अनुभव पाहता साधारणतः दोन किंवा तीन आठवड्यांचे होते. यंदाचे अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
Join Our WhatsApp Community