देशात सध्या युवकांची दिशाभूल होत आहे, यामागे जसा बंदुका हाती घेतलेले नक्षलवादी कारणीभूत आहेत, तसे लेखणीच्या माध्यमातून युवकांची भरकटवणारे शहरी नक्षलवादीही कारणीभूत आहेत, या दोन्ही प्रकारच्या नक्षलवादाचा बिमोड करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. फरिदाबाद येथे सुरू असलेल्या राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांच्या चिंतन शिबिराला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संबोधित करताना म्हटले की, देशातील तरुणांच्या भावनांचा चुकीच्या कामासाठी वापर केला जात आहे. अशा प्रकारे देशाची राष्ट्रीय एकात्मता बिघडवणाऱ्या शक्तींचा बिमोड करण्यासाठी बौद्धिक क्षमता वाढवणेही गरजेचे आहे. भारतीय संविधान, कायदा, व्यक्ती स्वातंत्र्याची भाषा या विघातक शक्तींकडून वापरली जाते. साध्या भोळ्या चेहऱ्या मागील देशविघातक शक्ती ओळखणे गरजेचे असून त्यासाठी पोलिसांनी अधिक सक्षम बनावे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
(हेही वाचा ख्रिस्ती धर्मगुरू आणि नन देखील बघतात पॉर्न व्हिडिओ, पोप फ्रान्सिस यांची जाहीर कबुली)
एक देश एक गणवेश
केंद्रीय तपास संस्थांना विविध राज्यांमध्ये तपास करावा लागतो. राज्यांनी देखील तपास यंत्रणांना सहकार्य केले पाहिजे, ही त्यांची जबाबदारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. कोणतीही तपास यंत्रणा असो, राज्यांचे पोलीस असो, प्रत्येकांने एकमेकांना सहकार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुमजली पोलीस ठाणे उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तळ मजल्यावर पोलीस ठाणे असेल आणि इमारतीच्या इतर मजल्यावर पोलिसांसाठी घरे असतील. त्यामुळे शहरापासून दूर राहणाऱ्या पोलिसांची मोठी समस्या सुटेल असे त्यांनी म्हटले. पोलिसांनी सरकारच्या धोरणांनुसार जुन्या वाहनांचा वापर करण्याचे टाळले पाहिजे असेही त्यांनी म्हटले. ‘एक देश, एक पोलीस गणवेश’ याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रह धरला. माझे मत मी थोपवू इच्छित नाही. पण, देशातील पोस्ट खात्याच्या धर्तीवर देशभरातील पोलिसांसाठी एकच गणवेश असावा अशी सूचनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
Join Our WhatsApp Community