राजस्थानमधील भिलवाडा येथे स्टॅम्प पेपरवर मुलींच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जात असल्याच्या बातम्यांची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने तेथील मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. 28 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, ही घटना अत्यंत निंदनीय आणि भयानक आहे. या प्रकरणी आयोगाने दोन सदस्यीय पथक स्थापन केले असून, ते राज्यामध्ये जाऊन या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करणार आहेत.
मुली विकण्याचे प्रकरण उघडकीस
राजस्थानच्या भिलवाडा गावात कर्ज न फेडल्याच्या बदल्यात स्टॅम्प पेपरवर मुलींची खरेदी-विक्री केली जात आहे. येथील अनेक वस्त्यांमध्ये राहणाऱ्या गरीब मुलींची स्टॅम्प पेपरवर दलालांकडून खरेदी-विक्री केली जाते, असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये काही मुलींशी प्रत्यक्ष बोलल्याचा दावादेखील करण्यात आला होता. यामध्ये पीडित मुलींनी स्टॅम्प पेपरवर आपली विक्री झाल्याचे सांगितले. तसेच, बलात्कार केल्याचेही त्यांनी सांगितले.
( हेही वाचा: गृहिणींचे बजेट कोलमडणार; भाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ )
Join Our WhatsApp Community