राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग त्याच बरोबर पर्यटन विभागाच्या बँक खात्यावरून बनावट धनादेशच्या माध्यमातून एका महिन्यात १ कोटी १६ लाख ६० हजार रुपये विविध बँक खात्यावर वळते करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एका महिन्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात चार जणांची नावे दिली असून या चौघांच्या खात्यावर पैसे वळते झाल्याचे (Bank Fraud) तक्रारीत म्हटले आहे.
४ व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल
नमिता बाग, प्रमोद सिंग, तपन कुमार आणि झीनत खान असे या चौघांची नावे असून त्यात तीन महिला आहे. परंतु ही नावे खरी आहे की बोगस याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हाजे यांनी २२ एप्रिल रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २ मार्च ते २२ एप्रिल २०२४ दरम्यान ही फसवणूक झालेली असून शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या खात्याचे ४७.६० लाख रुपयांचे बनावट धनादेश तयार (Bank Fraud) करण्यात आले होते. धनादेश ४ व्यक्तीच्या बँक खात्यात १० विविध धनादेश विविध तारखेला जमा करण्यात आले. संबंधित विभागाचे बँक खाते तपासत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी उपसचिव सुनील हाजे यांच्या तक्रारीवरून ४ व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात तीन महिलांच्या नावाने बँक खाते असल्याचे समोर आले आहे.
चेक क्लोनिंगचा प्रकार असू शकतो
हे बँक खाते नक्की कुठून वापरले जात आहे, तसेच हे खात्यावरील नावे खरे आहेत का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बँक खात्यातून रक्कम काढण्यात आलेली असून या प्रकरणी तपास सुरू आहे. महिन्याभरापूर्वी असाच प्रकार राज्य शासनाच्या पर्यटन विभागात झाला होता, आरोपींनी हीच पद्धत वापरून ६९ लाख रुपयांचे धनादेश बनवून विविध बँक खात्यात हे धनादेश वटविण्यात (Bank Fraud) आले होते. याप्रकरणी देखील गुन्हा दाखल झाला होता, या गुन्ह्याचा तपास सुरू असताना दुसरी घटना समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा चेक क्लोनिंगचा प्रकार असू शकतो, या फसवणुकीत माहितगार व्यक्तीचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Join Our WhatsApp Community