पडताळणी न करता ११ पोलीस प्रमाणपत्रे करण्यात आली जारी, पोलीस कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात

191
पडताळणी न करता ११ पोलीस प्रमाणपत्रे करण्यात आली जारी, पोलीस कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात
पडताळणी न करता ११ पोलीस प्रमाणपत्रे करण्यात आली जारी, पोलीस कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात

मुंबईच्या बाहेर राहणाऱ्या ११ रिक्षा चालकांचे ‘पोलीस पडताळणी प्रमाणपत्र’ मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेकडून पडताळणी न करताच सांताक्रूझ येथील एका बंगल्याच्या पत्यावर पोस्टाने पाठविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या बंगल्याचा पत्ता पोलीस पडताळणीसाठी देण्यात आला त्या पत्यावर पोलीस पडताळणीसाठी आलेच नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात दोन आरटीओ दलालांसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरटीओ दलालांना अटक करण्यात आली आहे. पोलीस पडताळणी प्रमाणपत्र घोटाळ्यात पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. इतर वेळी सामान्य मुंबईकरांना पोलीस पडताळणी प्रमाणपत्रासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवूनही वेळेवर पोलीस पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होतो, मात्र मुंबईच्या बाहेर राहणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे सादर करूनही प्रमाणपत्रे वेळेत कसे पोहचवले जाते असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मनोज खंदारे हे सांताक्रूझ पूर्व येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या राहत्या पत्यावर काही आठवड्यांपूर्वी पोस्टाने एक पत्र आले होते, त्या पत्रावर खंदारे यांच्या घराचा पत्ता होता, व त्याच्यावर नाव मात्र आजम खान असे होते. खंदारे यांनी ते पत्र उघडले असता त्यात ६ वेगवेगळ्या नावाने पोलिस पडताळणी प्रमाणपत्र व त्या प्रमाणपत्रात रिक्षा बॅचसाठी प्रमाणपत्र असे लिहले होते. या प्रमाणपत्रांवर नावे वेगवेगळी परंतु पत्ता एकच होता. आजम खान, इमरान, गफरान अली, मो. अकिब, अविस आलम, साबीद खान या नावाने पोलीस पडताळणी प्रमाणपत्रे होती. दोन दिवसांनी आणखी काही पत्रे खंदारे यांच्या पत्यावर प्राप्त झाले त्यात पाच जणांची पोलीस पडताळणी प्रमाणपत्रे होती.

याबाबत खंदारे यांनी निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास करून एका व्यक्तीची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले असता त्याने जयप्रकाश गुप्ता आणि प्रदीप गुप्ता नावाच्या आरटीओ दलालांना रिक्षा बॅच परवानाचे काम दिले होते. त्यासाठी या दलालांनी प्रत्येकी १० ते १२ हजार त्यांनी घेतले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली, या दलालांनी खंदारे यांच्या घराचा पत्ता वापरून खोटा भाडेकरू करारनामा तयार केला होता, व ही कागदपत्रे त्यांनी पोलीस पडताळणीसाठी ऑनलाइन जमा केली होती असे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी जयप्रकाश गुप्ता आणि प्रदीप गुप्ता या आरटीओ दलालांना अटक केली आहे. या दोघांनी पोलीस पडताळणी प्रमाणपत्रासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे कृत्य केले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे घेणार मुलांमधील शिक्षणाचा कल)

पोलीस पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे काय?

‘पोलीस पडताळणी प्रमाणपत्र’ हे पोलिसांच्या विशेष शाखेतून दिले जाते. अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच वास्तव्याचे ठिकाण पडताळणी केल्यानंतर हे प्रमाणपत्र पोलीस विभागाकडून जारी केले जाते. ‘पोलीस एनओसी’ अर्थात ‘पोलीस पडताळणी प्रमाणपत्र’ सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या ठिकाणी पोलीस एनओसीची प्रत्येक सामान्यांना गरज भासते. अर्जदारावर संबंधित आयुक्तालयात गुन्हेगारी स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत का, तुम्ही दिलेल्या पत्यावर तुमचे वास्तव्य आहे का, या गोष्टींची पडताळणी होऊन अर्जदाराची पार्श्वभूमी तपासली जाते.

पोलीस पडताळणी प्रमाणपत्र पोलिसांच्या विशेष शाखेकडून दिले जाते. पोलीस पडताळणीसाठी अर्जासोबत दिलेली कागदपत्रे तपासली जातात, अर्जदाराने दिलेल्या पत्यावर तुम्ही वास्तव्यास आहे का याची पडताळणी करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई येऊन विचारपूस करून अर्जदार दिलेल्या पत्यावर राहण्यास असल्याची खात्री केल्यानंतरच त्याचा अहवाल विशेष शाखेला पाठवला जातो. अर्जदार जर दिलेल्या पत्यावर मिळून आला नाही, किंवा तो त्या ठिकाणी राहत नसेल तर तसा अहवाल विशेष शाखेला पाठविण्यात येतो. त्यानंतर इतर गोष्टी पडताळून बघून पोलीस पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.