बालविवाहासंदर्भात कितीही जनजागृती झाली असली तरी देखील महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अद्यापही बालविवाह होत असल्याच्या घटना समोर येत असतात. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामधून असाच बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. तरीही कायद्याला नजुमानता अल्पवयीन मुलींचे विवाह केले जातात. चिखलदरा तालुक्यात राहणाऱ्या एका मुलीचे तिच्या नातेवाइकांनी एका तरुणासोबत लग्न लावून दिले. दरम्यान, त्या मुलीने एका बाळाला जन्म दिला. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अल्पवयीन बाळंतीण मुलीच्या पतीसह तिच्या सासर व माहेरच्या व्यक्तींविरुद्ध बलात्कार, पोक्सो तसेच बालविवाह कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
(हेही वाचा – कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा)
चिखलदरा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला प्रसूतिवेदना सुरू झाल्यामुळे तिला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान अचलपूरहून त्या अल्पवयीन गर्भवती मुलीला अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात आणले होते. स्त्री रुग्णालयात अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली. मात्र तिचे वय कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर वैद्यकीय यंत्रणेने गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या पतीविरुद्ध बलात्काराचा तसेच पंधराव्या वर्षी लग्न लावून दिल्यामुळे तिच्या माहेरच्या व सासरच्या अशा एकूण दहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community