मंत्रालय परिसर हा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा मिटिंग पॉईंट बनला आहे. वेगवेगळ्या मंत्र्यांच्या नावाचा वापर करून मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. असाच प्रकार नुकताच घडला असून कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून एका टोळीने व्यवसायिकाला जवळपास दोन कोटींचा गंडा घातला आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Financial Fraud)
माटुंगा येथे राहणारे व्यवसायिक एरीक अंकल्सरिया (४४) हे कोविड काळात खारघर येथील कॉरंटाइन सेंटर मध्ये उपचार सुरू असताना २६ वर्षीय अली रजा शेख याच्या सोबत ओळख झाली होती. ओळखी दरम्यान एरीक यांनी त्यांच्यावर तुर्भे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात संगितले. क्वारंटाइन सेंटर मधून बरे होऊन बाहेर पडल्यानंतर २०२१ मध्ये अली रजा याने एरीक याला फोन केला होता, त्याच्यावर दाखल असलेला गुन्ह्यातून त्याला मुक्त करण्यासाठी मदत करेल असे त्याने एरीकला सांगितले. अली रजाने त्याचे मंत्री, उच्च न्यायालयातील न्यायाधीश, नामांकित वकील यांच्यासोबत ओळख असल्याचे सांगितले होते. (Financial Fraud)
अली रजा याने नवी मुंबईत एका हॉटेलमध्ये एरीकची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्याने जय उर्फ राजू मंगलांनी याची ओळख करून दिली आणि त्याची मंत्री आणि न्यायाधीश यांच्या सोबत ओळख असल्याचे सांगून गुन्ह्यातून बाहेर काढू असे एरीकला सांगितले. एरीकने तयारी दाखविल्यावर कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे काम करणारी व्यक्ती वाल्मिक गोल्हेर हे आपले काम करतील असे सांगून वाल्मिक सोबत याची भेट ठरवून विधानभवन परिसर हे मिटिंग पॉईंट ठरले. एरीक आणि अली रजा हे विधानभवना बाहेर भेटले व वाल्मिक हा त्याना विधानभवनाच्या आत घेऊन गेला, त्या ठिकाणी त्यांची मिटिंग झाली आणि वाल्मिक याने या कामासाठी ४७ लाख रुपये खर्च येईल असे एरीकला सांगितले आणि सर्व व्यवहार रोखीने होतील असे सांगितले. (Financial Fraud)
(हेही वाचा – Perfume Ban : वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांना परफ्युम वापरण्यावर बंदी, काय आहे कारण ? वाचा सविस्तर…)
एरीकने मान्य केल्यानंतर या टोळीने थोडे थोडे करून एरीक कडून पैसे काढले. त्यानंतर लिकर परवाना देण्याच्या नावाखाली पैसे काढले, अलीने एरिकला एपीएमसी बाजारात पैसे गुंतवणूक करण्यास सांगून या टोळीने पैसे लाटले. या टोळीने कामे करून देण्याच्या नावाखाली एरीक कडून जवळपास १ कोटी ९५ लाख ८५ हजार रुपये लाटले. मात्र, तिन्ही कामापैकी एकही काम न करता एरीकची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर एरीक याने माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. माटुंगा पोलिसांनी या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वपोनी. दीपक चव्हाण यांनी दिली. या पूर्वी देखील विविध टोळ्यांकडून फसवणूकीच्या गुन्ह्यासाठी मंत्रालय, विधानभवन परिसर तसेच सरकारी मुख्यालय परिसर ठरवले जात असल्याचे अनेक गुन्ह्यात समोर आलेले आहे असे एका अधिकारी यांनी सांगितले. (Financial Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community