उत्पादन शुल्क न भरता लपूनछपून होणारी मद्याची तस्करी, त्याचबरोबर हातभट्टीची दारू बनविणाऱ्यांविरोधात वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाया केल्या. त्याअंतर्गत एका वर्षात ३९ हजार गुन्ह्यांची नोंद करून ३२ हजार ८२५ जणांना बेड्या ठोकल्या. तर २२६ कोटींचा मद्यसाठा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
बंदी असतानाही राज्यात अनेक ठिकाणी लपूनछपून हातभट्टीच्या दारूची निर्मिती, विक्री आणि तस्करी केली जाते. दाखल गुन्ह्यांपैकी ४८ टक्के गुन्हे हे हातभट्टी विरोधात नोंदविले गेले आहेत. ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक या ठिकाणी हातभट्टी विरोधात सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत.
कर चुकवून परराज्यातून गुपचूप होणाऱ्या मद्य तस्करीविरोधात एक हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ५० कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गोवा, दमण येथून येणाऱ्या मद्यावर सर्वाधिक कारवाई झाल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याशिवाय ताडीमाडी विरोधातही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
(हेही वाचा – मालेगावच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा छळ; अधीक्षकांसह तिघेजण बडतर्फ)
या ठिकाणांवर ‘वॉच’
चोरून मद्याची विक्री करणारे ढाबे, हॉटेल्स तसेच वाईन शॉपवरती देखील उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. या कारवाया यापुढेही मोठ्या प्रमाणात सुरू राहतील. शिवाय मद्य तस्करी, हातभट्टी विरोधात तक्रार द्यायची असल्यास १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर अथवा ८४२२००११३३ या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन या विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community