26/11 Mumbai Attack : तहव्वूर राणाची एनआयएकडून रोज ८-१० तास चौकशी; कुठे रचला दहशतवादी कट

41

मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याला अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर एनआयए (NIA) कोठडीत त्याची रोज ८-१० तास कसून चौकशी केली जात आहे. २००८ मधील २६/११च्या या हल्ल्याचा कट नेमका कुणी, कुठे आणि कसा आखला ही माहिती मिळवण्यासाठी ही चौकशी सुरू आहे. एनआयएच्या चौकशी पथकाचे नेतृत्व मुख्य तपास अधिकारी जया रॉय करीत आहेत. (26/11 Mumbai Attack)

(हेही वाचा – Shalarth ID Scam : तब्बल ५८० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अपात्र; नियुक्त्या रद्द होणार, पगारही वसूल करणार?)

२६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईतील भीषण नरसंहारापूर्वी राणा उत्तर किंवा दक्षिण भारतातील काही भागांत फिरला होता का याची माहिती चौकशीत मिळेल, अशी आशा आहे. मुंबईतील या हल्ल्यांत १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर २३८ हून अधिक जखमी झाले होते.

अत्यंत कडवा दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणा यास सीजीओ कॉम्प्लेक्समधील दहशतवादविरोधी संस्थेच्या मुख्यालयात अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या एका कोठडीत ठेवण्यात आले आहे. येथे चोवीस तास सुरक्षा जवान तैनात आहेत.

ही चौकशी सुरू असताना राणाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. दिल्लीतील न्यायालयाने राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावल्यानंतर राणाची वैद्यकीय तपासणी तसेच वकिलांची भेट घेण्यासंदर्भात न्यायालयाने निर्देश दिले.

आतापर्यंत राणाने कोठडीत पेन, कागद आणि कुराण या तीनच वस्तूंची मागणी केली असून त्या त्याला पुरवण्यात आल्या आहेत. ६४ वर्षीय पाकिस्तानी वंशाचा कॅनडातील व्यावसायिक असलेल्या राणा याच्या विरोधात जमा असलेल्या पुराव्यांच्या आधारे ही चौकशी होत आहे. यात राणाचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडली (David Headley) ऊर्फ दाऊद गिलानी याच्याशी झालेल्या फोन कॉलचा समावेश आहे. हेडली अमेरिकी नागरिक असून तो तेथील तुरुंगात आहे. (26/11 Mumbai Attack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.